तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह एकूण 14 जण या हेलिकॉप्टरमध्ये होते. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. तसेच, हवाई दलाने अपघाताच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे हा अपघात घडला. जखमींना वेलिंग्टन बेसमध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे.
तामिळनाडूचे वनमंत्री के. रामचंद्रन यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "मी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार येथे (हेलिकॉप्टर दुर्घटनास्थळी) आलो आहे. हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. बचावकार्य सुरू आहे."
प्राथमिक माहितीनुसार, सीडीएस बिपिन रावत आपल्या पत्नीसह वेलिंग्टनमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. वेलिंग्टन येथे सशस्त्र दलांचे महाविद्यालय आहे. येथे सीडीएस रावत यांचे लेक्चर होते. यानंतर, ते येथून कुन्नूरला परतत होते. कारण त्यांना येथून दिल्लीला रवाना व्हायचे होते. मात्र घनदाट जंगलात हा अपघात घडला. हा परिसर अत्यंत घनदाट असल्याचे सांगण्यात येते. येथे सर्वत्र केवळ झाडेच-झाडे आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की मोठ्या प्रमाणावर आगीच्या ज्वाळा दिसून येत होत्या. पोलीस, लष्कराचे जवान तसेच हवाई दलाचे जवान बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच परिसरात शोधमोहीमही राबवली जात आहे.
हेलिकॉप्टरमध्ये होते बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि कर्मचारी -ये हेलिकॉप्टर एमआय-सीरीजचे होते. अपघात झाला तेव्हा, हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि त्यांचा डिफेंस स्टाफ बसलेला होता. अपघातानंतर स्थानीय लोकही रेस्क्यू अभियानात मदतीसाठी धावले.