ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 7 - जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराने उघडलेल्या मोहिमेस आज पुन्हा मोठे यश मिळाले आहे. आज कुपवाडा जिल्ह्यातील माछिल विभागात लष्कराने घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणूण पाडला असून, या कारवाईत चार दहशतवाद्यांना ठार केले आहे. आज संध्याकाळी लष्कराच्या अधिकाऱ्याने ही बातमी दिली असून, या भागात दहशतवाद्यांविरोधातील शोधमोहीम सुरू आहे.
श्रीनगर येथे लष्कराचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ""काल रात्री दहशतवाद्यांचा एक गट नियंत्रण रेषा पार करून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे गस्तीवरील जवानांनी पाहिले. त्यानंतर जवानांनी या दहशतवाद्यांविरोधात कारवाईस सुरुवात केली. त्यानंतर दहशतवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या कारवाईत हे दहशतवादी मारले गेले."" अधिक वाचा : लष्कराच्या हाती मोठं यश, दहशतवादी दानिश अहमदचं आत्मसमर्पण,
ठार मारण्यात आलेल्या दहशतलाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच या दहशतवाद्यांकडे जीपीएस सिस्टीमही आढळली आहे. दरम्यान, या भागात लष्कराची शोधमोहीम सुरू आहे. लष्कराने गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्यात अनेक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी काश्मीरमधल्या बंदीपोरामध्ये सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता, या हल्ल्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
#UPDATE 4 terrorists killed in J&K"s Machil sector; weapons including 3 AK-47s recovered. Operation still going on.— ANI (@ANI_news) June 7, 2017