आग्रा - अरुणाचल प्रदेशमधील अल्फा संघटनेच्या अतिरेक्यांशी दोनहात करताना भारतीय सैन्यातील जवान अमित चतुर्वेदी यांना वीरमरण आले. आपल्या शहीद मुलाचे शव तिरंग्यात लपेटून भल्या सकाळीच चतुर्वेदी यांच्या घरी दाखल झाले. त्यावेळी हजारो गावकऱ्यांनी भूमिपुत्राला अखेरचा सॅल्यूट करण्यासाठी गर्दी केली होती. स्थानिक आमदार, खासदार आणि राजकीय नेत्यांसह महिलांनीही मोठी गर्दी केली होती. तर, तरुणांनी हातात तिरंगा घेऊन शहीद अमित चतुर्वेदी यांच्या कर्तृत्वाला सलाम केला. यावेळी वीरपित्यानेही आपल्या मुलाचा अभिमान असल्याचे सांगत त्यास अखेरचा सॅल्यूट केला.
आग्र्यातील बीसलपूर निवासी रामवीर चतुर्वेदी हे निवृत्त सुभेदार आहेत. रामवीर यांचे तिन्ही मुले भारतीय सैन्यात देशसेवा करतात. सुमित, अमित आणि अरुण अशी तिघांची नावे असून अमित यांना वीरमरण प्राप्त झाले. अमितने एप्रिल 2014 मध्ये भारतीय सैन्यदलात प्रवेश केला होता. 17 पॅरा फील्ड रेजिमेंटमध्ये अमित यांची पोस्टींग झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून अमित यांची पोस्टींग अरुणाचलच्या टू माऊंटेन डिब येथे करण्यात आली होती. 3 जून रोजी गावाकडे येण्यासाठी रिझर्व्हेशन करण्याचे अमित यांनी वडिलांशी बोलताना म्हटले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी रामवीर यांना आग्रा सेना मुख्यालयातून फोन आला. त्यावेळी, युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम संघटनेच्या अतिरेक्यांशी लढताना अमित यांना वीरमरण आल्याचे सांगण्यात आले. रामवीर यांनी ही बातमी ऐकताच चतुर्वेदी कुटुंबावर शोककळा पसरली.
3 जून रोजी अमितचा वाढदिवस असतो. त्यामुळे अमित कुटुंबासमेवत वाढदिवस साजरा करू इच्छित होते. विशेष म्हणजे 1 जून रोजी सुट्टी न मिळाल्याने 3 जून रोजीचे रिझर्व्हेशन अमित यांनी केले होते. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते. 3 जून रोजी अमित आपल्या घरी पोहोचले, पण तिरंग्यात लपेटून. दरम्यान, एप्रिल महिन्यातच अमित यांचा साखरपुडा झाला होता. त्यावेळी ते 10 दिवसांच्या सुट्टीवर आपल्या घरी आले होते. तसेच, आपल्या मित्रांना पार्टी दिल्यानंतर 1 मे रोजी ते पुन्हा अरुणाचल प्रदेशमध्ये कर्तव्यावर तैनात झाले होते.