श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पूंछ सेक्टर परिसरात सीमारेषेवर तैनात असणारे भारतीय जवानदेखील दिवाळी साजरी करत आहेत. पूंछजवळ पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. पण पाकिस्तानकडून होणा-या या कुरापतींचा दिवाळी साजरी करण्याच्या भारतीय जवानांच्या भावनेवर काहीही परिणाम झालेला नाही.
जवानांनी नियंत्रण रेषेजवळ दिवे लावले. यादरम्यान, जवानांनी जल्लोषदेखील साजरा केला. जवानांनी दिव्यांद्वारे ''Happpy Diwali'' असे लिहून देशवासियांनाही शुभेच्छा दिल्या. शिवाय, देशवासियांना सुरक्षेचादेखील विश्वास दिला. यावेळी एका जवानानं असे सांगितले की, 'देशवासियांना दिवाळी पूर्ण उत्साहानं साजरी केली पाहिजे. सीमारेषेवर आम्ही तैनात आहोत आणि शत्रूंना सडेतोड उत्तर देण्यासाठीही तयार आहोत''.
दरम्यान, गेल्या काही महिन्यात पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पूंछ परिसरातील स्थानिकांना पाकिस्तानकडून होणा-या गोळीबाराचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर जवानांनी पूंछमधील स्थानिकांसोबत दिवाळी साजरी करत त्यांना ''आम्ही नियंत्रण रेषेवर आपले कर्तव्य बजावत आहोत, त्यामुळे तुम्ही उत्साहात दिवाळी साजरी करा'', असे सांगत त्यांच्या सुरक्षेचा विश्वास दिला.