नायडूंकडे गीतेंची नाराजी
रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
भाजपाकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याची भावना असलेल्या शिवसेनेच्या खासदारांना लोकसभेत सन्मानजनक वागणूक देण्याऐवजी मागच्या रांगेत बसविल्याबद्दलची तीव्र नाराजी शिवसेनेचे गटनेते व केंद्रीय अजवड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडे मंगळवारी व्यक्त केली. त्यानंतर खा. शिवाजीराव आढळराव पाटील व खा. भावना गवळी यांनी दुपारच्या सत्रतील कामकाजात भाग घेतला नाही.
भाजपाच्या नवीन खासदारांसोबत शिवसेनेच्या ज्येष्ठ खासदारांना बसविण्यात आल्याने शिवसेना खट्ट झाली आहे. लोकसभेत खासदारांना ते कितव्यांदा निवडून आले, या निकषाच्या आधारे आसन दिले जाते. माजी मंत्री किंवा आमदार राहिले असतील तर हा अनुभवही यासाठी एक पात्रता आहे. मंगळवारी सकाळी लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यावर खा. भावना गवळी गेल्या लोकसभेत त्यांना दिलेल्या पुढच्या रांगेतील जागेवर गेल्या तेव्हा ती अन्य खासदारांना दिल्याचे दिसून आले.
दुय्यम वागणूक
संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या
नायडू यांनी झाल्या प्रकाराची चौकशी करून तोडगा काढतो असे आम्हाला सांगितले आहे.
- खा. शिवाजीराव आढळराव पाटील
आढळराव पाटील तीनदा व जाधव दोनवेळा खासदार झाले आहेत. आसन नियोजन करताना अनुभव विचारात घेतला जातो, मात्र ज्येष्ठतेचा विचार न करता आम्हा तिघांनाही सातव्या रांगेमध्ये प्रथमच निवडून आलेल्या खासदारांसोबत बसविण्यात आले. - खा. भावना गवळी