नवी दिल्ली - आपल्या जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर कोसळणारा दु:खाचा डोंगर सरता सरत नाही. अशा परिस्थितीतून सावरण्यासाठी अनेकांना कित्येक दिवस लागतात. पण मग आपल्या लष्करी जवानांचे कुटुंबिय अशा परिस्थितींना कशाप्रकारे सामोरं जात असतील हा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का ? नुकतंच एका महिला लष्करी अधिका-याने खंबीरपणे उभं राहणं काय असतं हे दाखवून दिलं आहे. विंग कमांडर डी वत्स यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान असं काही घडलं की, अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांमध्ये अभिमान आणि आदर झळकू लागला. डी वत्स यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांची पत्नी आपल्या पाच दिवसांच्या नवजात बाळासोबत पोहोचली होती. बाळाला कवेत घेऊन अंत्यसंस्कारासाठी पोहोचलेल्या त्यांना पाहून उपस्थितांची छाती अभिमानाने फुलली होती.
आसाममध्ये 15 फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. मजुली आयर्लंडवर हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. या अपघातात दोन पायलट्स शहीद झाले, त्यांच्यापैकी एक होते विंग कमांडर डी वत्स.
डी वत्स यांची पत्नी मेजर कुमूद डोगरा स्वत: लष्करात अधिकारी आहेत. नुकतंच त्यांच्या घरी बाळाचं आगमन झालं असून ते फक्त पाच दिवसांचं आहे. मात्र एकीकडे सुखाची वार्ता आली असताना त्यांच्यावर हा दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र त्यातून सावरत त्यांनी अंत्यसंस्काराला हजेरी लावली. आपल्या पाच दिवसाच्या बाळाला कवेत घेत लष्करी गणवेशात त्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचल्या. त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मेजर कुमूद डोगरा यांच्या शौर्य आणि हिंमतीसाठी सर्वजण त्यांना सलाम करत आहेत. आपल्या वडिलांचा चेहराही न पाहू शकलेल्या त्यांच्या मुलीला अनेकांनी आपलं प्रेम दिलं आहे.