नवी दिल्ली : वर्षाच्या सुरुवातीलाच लष्करातील 50 हून अधिक जवान पाकिस्तानकडून हनी ट्रॅप झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडालेली असताना आज लष्कराने इन्स्टाग्रामवरील एका महिलेपासून सावध राहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
भारतीय लष्कराचे 50 जवान हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. या जवानांकडून लष्कराशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवण्यात आल्याचा संशय आहे. या प्रकरणी सोमवीर नावाच्या जवानाला पोलीस आणि लष्करानं जानेवारीमध्ये अटक केली होती. सोमवीरनं एका पाकिस्तानी तरुणीला सोशल मीडियाच्या माध्यमातून संवेदनशील माहिती दिल्याचा संशय होता.
केवळ पाच हजार रुपये आणि अश्लील छायाचित्रांच्या बदल्यात या जवानानं देशाशी गद्दारी केल्याचं उघड झालं आहे. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला हादरवणाऱ्या या हनिट्रॅपच्या प्रकरणाची सुरुवात सोशल मीडियावरून झाली होती. हाय हॅलोच्या माध्यमातून जवान सोमवीर आणि पाकिस्तानी महिला एजंटमध्ये संवादाची सुरुवात झाली. या महिलेनं सोमवीरला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी काही अश्लील छायाचित्रं पाठवली होती. त्याबदल्यात या जवानानं लष्कराशी संबंधित माहिती, टँक, हत्यारबंद वाहने, हत्यारे आणि लष्करी कंपन्यांच्या स्थितीबाबतची माहिती या महिलेला पुरवली. यानंतर या महिलेने त्याला पाच हजार रुपयेही दिले.