निनाद देशमुखपुणे : कोरोना विषाणूचा सामना करायला केंद्र तसेच राज्यस्तरावरील यंत्रणेसोबत लष्करी यंत्रणा सज्ज आहे. या सर्व यंत्रणा एकत्र काम करत आहेत. आपातकालीन परिस्थतीतीसाठी लष्कर सज्ज आहे. देशातील लष्कराच्या रूग्णालयातही कोरोना विषाणूच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहीती इंटिग्रेटेड डिफेन्स सर्व्हिसेस मेडिकलच्या उपप्रमुख लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी लोकमतला दिली.देशात कोरोनाचे रूग्ण आढळले आहे. चीन तसेच इतर देशातून लष्कराच्या साह्याने भारतीय नागरिकांना देशात आणण्यात आले. या नागरिकांसाठी अनेक कॅम्प लष्करातर्फे लावण्यात आले आहे. कोरोना संदर्भात लष्कराची कशी तयारी आहे या संदर्भात कानिटकर म्हणाल्या, नागरिकांनी कोरोनाची भीती बाळगायची गरज नाही. आपल्याकडे स्वाईन फ्लू सारखे अनेक संसर्गजन्य आजार आले आणि गेले. मात्र, त्यासाठी पॅनिक होण्याची गरज नाही. भारतीय जवानांनाही कोरोनाचा संसर्ग होऊ नये या करिता उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या की, 'कोरोनाच्या निवारणासाठी देशभर लष्करी वैद्यकीय विभागातून जी काही मदत लागेल ती आम्ही देणार आहोत. अशी परिस्थिती जेव्हा येते तेव्हा सरकारचे सर्वत्र लक्ष असते. आम्ही जवानांना सूचना दिल्या आहेत की सारखे हात धुवावेत, स्वछता राखावी. सर्दी आणि इतर संसर्गजन्य आजार झाले तर मास्क वापरावेत. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. होळी खेळूच नये असे सांगितले नसले तरी गर्दीत न जाण्याचा सल्ला मात्र दिला आहे.कानिटकर म्हणाल्या, देशात अनेक विषाणूजन्न आजार बळावत असतात.
स्वाईन फ्लू, बर्ड प्लू तसेच अनेक आजारांचा फैलाव होत असतो. अशा परिस्थीतीत त्यांचे वेळेवर निदान होणे गरजेचे असते. पुण्यात असलेल्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेत याची तपासणी होते. मात्र, मोठ्या प्रमाणात नमुने आल्यास त्यांचे निदान होण्यास उशीर होतो. आयसीएमआरच्या अंतर्गत सगळी कडे प्रभावी यंत्रणा निर्माण करण्याचे आमचे प्रयत्न आहे. लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक यांनीही त्या संदर्भात सुचना केल्या आहेत. यामुळे वेगवेळळळ्या स्तरावरच्या प्रयोगशाळा देशात तयार करण्यात येत आहेत. या अंतर्गत लष्करात १० प्रयोगशाळा असतील. याचे समन्वय पुण्यातीळ लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातर्फे करण्यात येणार आहे.