लेह (लडाख) - चिनी सैन्याकडून सुरू असलेला घुसखोरीचा प्रयत्न, गलवानमध्ये झालेली हिंसक झटापट यामुळे सध्या भारत आणि चीनमधील द्विपक्षीय संबंध बिघडलेले आहेत. लडाखमधील अनेक संवेदनशील भागातून चीन घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याने अनेक ठिकाणी दोन्ही देशांचे सैन्य आमने सामने आले आहे. तसेच दोन्ही बाजूंकडून सीमेवर लष्कर, दारुगोळ्याची मोठी जमवाजमव करण्यात आली आहे. त्यातच चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही चीन मागे हटण्यास तयार नसल्याने आता भारतीय लष्कराकडून जशास तसे प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू झाली आहे. आता या तयारीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी लष्कप्रमुखांसोबत लडाखचा दौरा करणार आहेत. यापूर्वी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी लेह-लडाखचा दौरा केलेला आहे.
लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने खूप आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. त्यामुळे भारतीय लष्करानेही जोरदार तयारी केली आहे. अशा परिस्थितीत पूर्व लडाखमध्ये सध्या सुरक्षेची काय स्थिती आहे याचा आढावा राजनाथ सिंह या दौऱ्यातून घेणार आहेत. तसेच लष्करप्रमुखांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या दौऱ्याप्रमाणेच राजनाथ सिंह देखील काही फॉरवर्ड पोस्टला भेट देऊ शकतात.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गलवान खोरे, पेंगाँग सरोवर, डेपसांग प्लेन्स आणि हॉट स्प्रिंग्स भागात चिनी सैन्य आक्रमक भूमिकेत आहे. त्यामुळे भारताने देखील चिनी सैन्या एवढेच जवान या भागात तैनात केले आहेत. त्याशिवाय चीनने या भागात ज्या प्रकारची हत्यारे आणि दारुगोळा जमा केला आहे, ते पाहता भारताकडून देखील तयारी पूर्ण झाली आहे. यापूर्वी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी २३ जून रोजी लेह मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जवानांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना लडाखमधील काही फॉरवर्ड पोस्टचा देखील दौरा केला होता.
दरम्यान, सीमारेषेवर चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याचा सामना करण्यासाठी हवाई दलसुद्धा सज्ज झालेले आहे. संपूर्ण विभागात अॅडव्हान्स क्विक रिअॅक्शन क्षमता असलेली सरफेस टू एअर मिसाईल डिफेन्स सिस्टिम तैनात आहे. ही सिस्टिम कुठल्याही लढाऊ विमानाला काही सेकंदात नष्ट करू शकते. तसेच पूर्व लढाखमध्ये आकाश क्षेपणास्त्रांचीही पाठवणी करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या