ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 10 - सर्जिकल स्ट्राइकवरून काँग्रेसनं पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भाजपा अध्यक्ष अमित शाहा यांच्यावरही निशाणा साधला आहे. "देशकी सेना बलिदान करे, राम के अवतार मोदीजी बने", अशी नवी घोषणा देत काँग्रेसनं भाजपावर टोला लगावला आहे.
तत्पूर्वी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनीही सर्जिकल स्ट्राइकची कारवाई बनाव असल्याचे म्हटल्याने गोंधळ उडाला होता. काँग्रेसने लगेच निरुपम यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे सांगत सावधपणे यातून अंग काढून घेतले. दरम्यान, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही या कारवाईचे पुरावे जनता मागेल, असे वक्तव्य करून याबद्दल संशयाचे वातावरण निर्माण केल्यानं काँग्रेसचे मोदींविरोधात बेमालूम वक्तव्यं करणे सुरूच ठेवले आहे.
सैनिकांची वीरता आणि शौर्याचा भाजपा स्वतःच्या फायद्यासाठी लाभ उठवत आहे. सर्जिकल स्ट्राइकचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न भाजपानं करू नये. त्यामुळे केंद्र सरकारनं याबद्दल राष्ट्राची माफी मागण्याची गरज असल्याचं मतही काँग्रेसनं व्यक्त केले आहे.