नवी दिल्ली - महाराष्ट्रासह केरळ आणि तामिळनाडू राज्यांनाही पुराचा फटका बसला आहे. राज्यातील कोल्हापू, सांगली आणि सातारा येथे पुराच्या पाण्यामुळे हाहाकार माजला आहे. आलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी झाल्याने पूरग्रस्तांना किंचीत दिलासा मिळाला आहे. या पूरपरिस्थितीत पूरग्रस्तांसाठी 60 हून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला आहे. तर, सैन्य दलाचे जवानही जीवाची बाजी लावून स्थानिकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढताना दिसत आहेत.
ओडिसा, पंजाब व गुजरातमधील NDRFHQ चे 22, नौदलाच्या 26, तटरक्षक दलाचे सांगलीमध्ये 2 व कोल्हापुरात 9 पथके दाखल आहेत सैन्यदलाचे 8 पथके, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे सांगलीमध्ये दोन तर कोल्हापुरात 1 अशी 3 पथके कार्यरत आहेत. तसेच कोल्हापुरात 76 व सांगलीमध्ये 90 बोटींद्वारे बचाव कार्य सुरू आहे. सैन्य दलाचे जवानांच्या कार्याचं स्थानिकांकडून डोळे भरून कौतुक होत आहेत. आमच्यासाठी आम्हाला वाचविणार सैनिकच देव असल्याची भावना तेथील लोकांकडून व्यक्त होत आहे.
सांगलीमध्ये पूरस्थिती अद्यापही कायम आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. कोल्हापूरपेक्षाही आता शिरोळ तालुक्याची परिस्थिती अजूनही गंभीर राहिल्याने प्रशासनाने जिल्ह्यातूनही बोटी तेथे मागवल्या आहेत. कोल्हापूर शहर, चिखली, आंबेवाडी येथील पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत सुरू झाली आहे. अन्नधान्य, तयार अन्न, औषधे, कपडे, सॅनिटरी नॅपकिन इथंपासून ते अगदी पेस्ट, ब्रशपर्यंत अनेक जीवनोपयोगी वस्तू पुरवल्या जात आहेत.
शिरोळमध्ये जवळपास 120 लष्कराच्या जवानांनी चार बोटीच्या साहयाने मोहीम राबवली. आपल्या पायांना जखमा झाल्या तरीही, सैन्याचे जवान मलमपट्टी करुन आपले कर्तव्य बजावत आहेत. शासनाची मदत नसतानाही सेवाभावी संस्थामार्फत पूरग्रस्त्तांना जेवण, चहा, नाष्टा दिला जात आहे. महाराष्ट्रासह, केरळ, तामिळनाडूतही पूरस्थिती आहे. याही राज्यात सैन्याचे जवान पूरस्थितीशी लढताना दिसत आहेत. महाराष्ट्रासह केरळ आणि तामिळनाडू येथून सैन्यातील जवानांनी 6000 पूरग्रस्तांना वाचविण्यात आलं असून 15000 नागरिकांची सुरक्षितस्थळी रवानगी करण्यात आली आहे. त्यासाठी, पूरग्रस्त 4 राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये सैन्य दलाच्या 123 तुकड्या कार्यरत आहेत.