नवी दिल्ली : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांच्या नावाने एक बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नौदल, वायुदल यांच्या तुलनेत भूदलाने शानदार कामगिरी केल्याचा या पत्रात दावा करण्यात आला आहे.
"माझी भारताच्या पहिल्या ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’पदी नियुक्ती करण्यात आली आहे. वायुदल आणि नौदल हे भूदलाच्या धर्तीवर काम करतील आणि चांगला कामगिरी करतील", असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय लष्कराच्या जनसंपर्क युनिट ADGPIने हे पत्र बनावट असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात ADGPIने ट्विटरवरून माहिती दिली आहे. 'काही लोक सोशल मीडियावर बनावट पत्र व्हायरल करून चुकीची माहिती पसरवत आहेत. यापासून सावधानता बाळगा', असे ट्विट ADGPIने केले आहे.
याशिवाय, भारत सरकारच्या सूचना व प्रसारण कार्यालयाने (PIB) एका फॅक्ट चेकमध्ये सांगितले आहे की, 'जनरल बिपिन रावत यांच्या नावे एक कथित पत्र सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. असे कोणतेही पत्र जनरल बिपिन रावत यांनी लिहिलेले नाही. हे पत्र बनावट आहे.
समन्वय आखण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी आणि तिन्ही दलांमध्ये योग्य समन्वय आखण्यासाठी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’हे पद निर्माण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात मंजुरी दिली होती. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धानंतर सैन्य दलांमध्ये योग्य समन्वय राखला जावा, यासाठी असा प्रकारचे पद निर्माण करण्याची शिफारस करण्यात आली होती. ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’सैनिकी मोहिमेदरम्यान तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्याचे काम करेल.
महाराष्ट्राचे पुत्र मनोज नरवणे यांनी लष्करप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली