जम्मू : जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्याजवळ असलेल्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यामध्ये एका जवानाला हौतात्म्य आले आहे. सन २०२१ मध्ये आतापर्यंत झालेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात झालेल्या चकमकीत भारताचे एकूण चार जवानांना हौतात्म्य आले, असे संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
पाकिस्तानी सैन्याकडून बुधवारी सुंदरबनी भागात कोणत्याही चिथावणीशिवाय शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानाकडून गोळीबाराला सुरुवात करण्यात आली. भारतीय जवानांनी याला चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात एक भारतीय जवान गंभीर जखमी झाला. मात्र, उपचारादरम्यान जवानाचा मृत्यू झाला, अशी माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हौतात्म्य आलेल्या जवानाचे नाव सिपाही लक्ष्मण असून, ते जोधपूरचे रहिवासी आहेत. सिपाही लक्ष्मण एक शूरवीर, प्रेरणादायी आणि समर्पित जवान होते. देशासाठी त्यांनी पत्करलेले हौतात्म्य आणि त्यांची निष्ठा देश कायम लक्षात ठेवेल, असे संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितले.
दरम्यान, जानेवारी महिन्यात पाकिस्तानाकडून आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात तीन जवानांना हौतात्म्य आले. गतवर्षी २०२० मध्ये पाकिस्तानकडून तब्बल ५ हजारपेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. याला भारतीय जवानांकडून वेळोवेळी चोख प्रत्युत्तर देण्यात आले. तसेच काही दिवसांपूर्वी तीन ते चार दहशतवाद्यांना भारतीय लष्कराकडून अटक करण्यात आली.
तत्पूर्वी, जम्मू काश्मीरमधील हीरानगर भागात असलेल्या पानसर येथे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना आणखी एक बोगदा सापडला. काही दिवसांच्या अंतराने सलग दुसरा बोगदा आढळून आल्याने खळबळ उडाली. नव्याने आढळलेल्या बोगद्याची लांबी सुमारे १५० मीटर असून, याची निर्मिती भारतात घुसखोरीसाठी करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांकडून या बोगद्याची निर्मिती करण्यात आली होती. याचा वापर दहशतवाद्यांना भारतात घुसखोरीसाठी करण्याची योजना होती, असेही सांगितले जात आहे.