श्रीनगर, दि. 16 - काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात लष्कराने व्यापक मोहीम उघडली आहे. आज पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा येथील बांदेरपोरा भागात दहशतवादी आणि लष्कर यांच्यात झालेल्या चकमकीत लष्कराने कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर आयुब ललहारी याला कंठस्नान घातले आहे. याआधी रविवारी झालेल्या चकमकीत लष्कराने हिज्बुल मुजाहिद्दिनचा स्वयंभू कमांडर यासिन इटू उर्फ गजनवी याच्यासह तीन अतिरेक्यांचा खात्मा केला होता. या चकमकीबाबत माहिती देताना जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी एस. पी. वैद्य म्हणाले की, आयूब ललहारीचा खात्मा हे भारतीय लष्कराच्या मोहिमेला मिळालेले मोठे यश आहे. ललहारी हा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता. आज बांदेरपोरा भागात एका घरामध्ये तीन दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर लष्कराकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर सुरू झालेल्या चकमकीत ललहारी याला ठार करण्यात आले." या ठिकाणी अद्याप चकमक सुरू आहे. तसेच सुरक्षा दलांनी लपून बसलेल्या दहशतवाद्यांना घेरले आहे. तसेच दोन्हीकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरू आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर 47 राष्ट्रीय रायफल्सच्या नेतृत्वाखाली लष्कर आणि राज्य पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने शोध मोहिम सुरू केली होती.
काश्मीरमध्ये लष्कराचा टॉप कमांडर आयुब ललहारीला कंठस्नान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 7:59 PM