लोकमत न्यूज नेटवर्क, लेह : लडाखमधील दक्षिण भागात न्योमा येथील कियारी परिसरात शनिवारी लष्कराचा एक ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात नऊ जवान शहीद तर एक जवान जखमी झाला. शहीद जवानांबद्दल संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शाह यांनी दु:ख व्यक्त केले.
या नऊ शहीद जवानांमध्ये एका ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसरचाही समावेश आहे. लेह येथील वरिष्ठ पोलिस अधीक्षक पी. डी. नित्या यांनी सांगितले की, या लष्करी ट्रकमधून १० जवान प्रवास करीत होते. हा ट्रक लेह येथून न्योमाला चालला होता. त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटून हा ट्रक दरीत कोसळला. ही दुर्घटना शनिवारी संध्याकाळी ४.४५ वाजता घडली.
लडाखमध्ये लष्करी ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात नऊ जवान शहीद झाले. त्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. लष्कराच्या या ताफ्यात तीन अधिकारी, दोन जुनिअर कमिशन्ड ऑफिसर आणि ३४ जवान यांचा समावेश होता. हे सर्व जण जिप्सी, ॲम्ब्युलन्स आणि एका ट्रकमधून प्रवास करत होते. ट्रकमध्ये १० जण होते. तोच ट्रक दरीत कोसळला.
गेल्या वर्षीही झाला होता असाच अपघात
- या अपघाताचे वृत्त कळताच पोलिस व लष्कराची मदत पथके घटनास्थळी रवाना झाली. त्यांनी तत्काळ तिथे बचावकार्य सुरू केले.
- या अपघातातील जखमी जवानांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, शहीद तसेच जखमी जवानांच्या नावांची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.
- याआधी लडाखमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यात लष्कराचा एक ट्रक लडाखमधील तुर्तुक क्षेत्रात रस्त्यावरून घसरून श्योक नदीमध्ये कोसळला होता.
- त्या अपघातात सात जवान शहीद व १९ जण जखमी झाले होते.