श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (3 मे) पहाटेपासून चकमक सुरू झाली. या चकमकीदरम्यान दहशतवाद्यांचा पोस्टर बॉय बुरहान वानीचा ब्रिगेड कमांडर लतीफ अहमद डार ऊर्फ लतीफ टायगरचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तसेच, दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनचे आणखी दोन दहशतवादी मारले आहेत. लतीफ टायगरच्या खात्मानंतर बुरहान वानीच्या गँगचा नायनाट झाला आहे.
सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये शोपियानमध्ये शुक्रवारी चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी लतीफ टायगर, तारिक मौलवी आणि शरिक अहमद नेंगरु दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर एक जवान जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बुरहान वानीचा चकमकीत खात्मा सुरक्षा रक्षकांनी 8 जुलै 2016 मध्ये चकमकीत बुरहान वानी याचा खात्मा केला होता. बुरहानचा खात्मा केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात तणावाचे वातावरण होते. तेव्हापासून आतापर्यंतच्या हिंसाचारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. हिज्बुल या दहशतवादी संघटनेचा मोस्ट वॉन्टेड असलेला बुरहान वानी हा येथील युवकांसाठी सोशल मीडियावर फेमस होता. काही महिन्यांपूर्वी स्थानिक लोकांना विचारले असता त्याला 'भारतीय एजेंट' असल्याचे सांगत. मात्र, सुरक्षा यंत्राणांसाठी बुरहान वाणी हा मीडियाने तयार केलेला कागदी वाघ होता.
पुलवामामधील त्राल परिसरात जन्म झालेला बुरहान वानी वयाच्या 15 व्या वर्षी दहशतवादी बनला होता. 22 व्या वर्षी सुरक्षा रक्षकांनी त्याचा खात्मा केला. बुरहान वानीच्या खात्माआधी काश्मीर खोऱ्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा नायनाट होण्यास आला होता. मात्र, गेल्या तीन वर्षात पुन्हा जैश-ए-मोहम्मदने डोके वर काढले आहे. काश्मीर खोऱ्यात शेकडो बुरहान वानी तयार करण्याचा उद्देश जैश-ए-मोहम्मद संघटनेचा आहे.
कोण होते बुरहान गँगचे 11 दहशतवादी?सुत्रांच्या माहितीनुसार, बुरहान वानी गँगमध्ये सामील 11 दहशतवाद्यांपैकी 10 जणांचा खात्मा करण्यात आला आहे. तर एक तारिक पंडितने सुरक्षा रक्षकांसमोर आत्मसमर्पण केले आहे. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे - सद्दाम पैडर, बुरहान वानी, आदिल खांडे, नसीर पंडित, अफ्फाक बट, अनीस, अश्फाक डार, वसीम आणि वसीम शाह. याशिवाय लफीत सुद्धा या गँगचा सदस्य होता.
स्थानिक युवकांची भरती जैश-ए-मोहम्मद संघटना आधी लष्कर-ए-तोयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीन यांच्या नेतृत्वाखाली काम करत होती. मात्र, या वर्षी सुरक्षा रक्षकांवर केलेल्या सरासरी हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा हात आहे. पुलावामा जिल्हा पाकिस्तानच्या सीमेपासून लांब आहे. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांना याठिकाणी पोहोचले मोठे जोखमीचे आहे. त्यामुळे जैश-ए-मोहम्मद संघटनेने स्थानिक युवकांची भरती सुरु केली.