श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये लष्कराला मोठं यश मिळालं असून तीन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आलं आहे. लष्कर आणि राज्य पोलिसांनी केलेल्या दहशतवादी विरोधी संयुक्त कारवाई ऑपरेशन कुंड अतंर्गत कुलगामसहित इतर राज्यातून तीन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आलं आहे. यामधील एक दहशतवादी जखमी आहे. जोपर्यंत गरज असेल तोपर्यंत दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरु राहील असं लष्कराने स्पष्ट केलं आहे.
जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली आहे की, '14 नोव्हेंबरपासून ही मोहीम सुरु आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत तीन दहशतवादी पकडले गेले आहेत. यामधील एक दहशतवादी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे'.
'काश्मीरमधील तरुणांना खोटी आश्वासनं देत दहशतवाद्यांसोबत सामील होण्यासाठी पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर मोहीम राबवली जात असून चुकीचा प्रचार केला जात आहे', अशी माहिती मुनीर खान यांनी दिली आहे. लष्कराने सांगितलं आहे की, जम्मू काश्मीर पोलिसांकडून उत्तम मदत मिळत असून जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत हे अभियान सुरु राहणार आहे.
दुसरीकडे, लष्कराने स्थानिक दहशतवाद्यांना दहशतवाद सोडून मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहन केलं आहे. काश्मीरमधील तरुणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कट्टरपंथी आणि दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्याचा ट्रेंड दिसत आहे. या लिस्टमध्ये माजिद खान हे एक नाव नव्याने जोडलं गेलं आहे. माजिद हा जिल्हास्तरीय फुटबॉल खेळाडू राहिला आहे. तो अनंतनागचा रहिवासी आहे. काही दिवसांपुर्वी त्याने दहशतवादी संघटनेत सामील होत असल्याची घोषणा केली. त्याच्या या निर्णयामुळे कुटुंब आणि मित्रांना चांगलाच धक्का बसला आहे.