नवी दिल्ली'रिपब्लिक टीव्ही'चे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या 'रिपब्लिक भारत' या हिंदी वृत्तवाहिनीला 'यूके'च्या प्रसारण नियामक मंडळाने २० लाखांचा दंड ठोठावला आहे. पाकिस्तानी लोकांबद्दल द्वेष आणि त्याचा प्रचार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
'यूके'मधील हिंदी भाषिकांपर्यंत 'रिपब्लिक भारत' वाहिननीचं प्रसारण पोहोचविण्यासाठीचं लायसन्स असलेल्या 'वर्ल्डव्ह्यू मीडिया नेटवर्क'ला 'यूके'च्या प्रसारण मंडळानं २० लाखांच्या दंडाची नोटीस पाठवली आहे. एखाद्या समाजाबद्दल किंवा द्वेषाची भावना निर्माण होईल असे कार्यक्रम यापुढे वाहिनीवर चालवले जाणार नाहीत याची लेखी हमी देखील देण्याचे आदेश 'रिपब्लिक'ला देण्यात आले आहेत.
अर्णव गोस्वामी यांच्या 'पूछता है भारत' या टीव्ही शोमध्ये ६ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या चर्चेबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. या कार्यक्रमात गोस्वामी यांच्याकडून पाकिस्तानी नागरिकांवर वारंवार हल्ला आणि त्यांच्याविरोधात समाजात द्वेष पसविण्याचं काम केल्याचं 'ऑफकॉम'ने म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये ऑगस्ट २०१९ पासून 'रिपब्लिक भारत' वृत्तवाहिनीचं प्रसारण सुरू आहे. या दरम्यान 'पूछता है भारत' या कार्यक्रमावर यूकेच्या प्रसारण नियामक मंडळाचं सातत्यानं लक्ष होतं. दैनंदिन पातळीवर हा कार्यक्रम चालवला जात असून त्याचं भाषांतर करुन आता लक्ष ठेवलं जाणार असल्याचं ऑफकॉमने म्हटलं आहे.
याआधीही २२ जुलै २०१९ रोजी भारताच्या 'मिशन चांद्रयान-२' बाबतच्या शोमध्ये अर्णब गोस्वामी यांच्यासोबत तीन भारतीय आणि तीन पाकिस्तानी पाहुणे चर्चेसाठी बोलविले होते. या चर्चेत भारताच्या अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञानातील प्रगतीबाबत पाकिस्तानशी तुलना केली गेली. भारताविरोधात पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया केल्या जातात असा आरोप देखील यामध्ये करण्यात आला, अशी नोंद ऑफकॉमने केली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये कलम ३७० च्या मुद्द्यावरुन तणावाची परिस्थिती असतानाच अशा टेलिव्हिजन कार्यक्रमांचं आयोजन करुन तणावात भर टाकण्याचं काम केलं गेलं, असा ठपका 'रिपब्लिक भारत'वर ठेवण्यात आला आहे.