नवी दिल्ली -उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिहारच्या एका सभेत, अर्णब गोस्वामी हे एक मोठे पत्रकार आहेत, असे म्हटले आहे. मात्र, यापूर्वी अर्णब गोस्वामी यांनी एका टीव्ही शोमध्ये त्यांना अशिक्षित आणि पागल म्हटले होते. यासंदर्भात समाजवादी पक्षाचे प्रवक्ता पवन पांडे यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करत, ‘क्या से क्या हो गया देखते-देखते,’ असे म्हटले आहे. पवन पांडे यांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये सीएम योगी आदित्य नाथ यांच्या भाषणाचा काही भाग आहे. यात ते काँग्रेसवर लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप करत आहेत. यात योगी आदित्यनाथांनी म्हटले आहे, ‘1975मध्ये काँग्रेसने आणीबाणी लादली होती आणि आजच आपण पाहिले असेल, की देशातील एका फार मोठ्या पत्रकाराला आपल्या स्वार्थासाठी अटक करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला करण्याचे काम काँग्रेसने केले आहे.’
या वेहिडिओच्या शेवटी, अर्णब गोस्वामी यांच्या त्या टीव्ही शोचाही काही भाग दाखवण्यात आला आहे. यात अर्णब गोस्वामी म्हणाले होते, ‘योगी आदित्यनाथ तर असे व्यक्ती आहेत, त्यांना धर्माच्या बाबतीत काही माहीतच नाही. असे अशिक्षित व्यक्ती आहेत, की कुणी सांगायला हवे, आपण आपले मेंटल बॅलेन्स चेक करून घ्या.’
अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक -रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सकाळी रायगडपोलिसांनी अटक केली. २०१८ मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात, 'अर्णब गोस्वामींनी सूडबुद्धीने पैसे थकवल्यानेच आपल्या पतीने आत्महत्या केली. अन्यथा ते आज जिवंत असते, असा गंभीर आरोप अन्वय यांच्या पत्नीने केला आहे.'
अर्णब आणि अन्वय यांच्यात कशावरून वाद झाला?अर्णब गोस्वामी यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये टाईम्स नाऊ वृत्तवाहिनीला रामराम केला. मी सहा महिन्यांत माझी नवी वाहिनी सुरू करेन, असं आव्हान गोस्वामींनी टाईम्स नाऊमधून बाहेर पडताना जैन यांना दिलं होतं. एखादी वाहिनी सुरू करण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागतो. पण गोस्वामी यांनी ६ महिन्यांत वाहिनी सुरू करता यावी यासाठी अन्वय नाईक यांच्यामागे स्टुडियोचं काम लवकर पूर्ण करण्याचा तगादा लावला. अन्वय यांना ६ महिन्यांत काम पूर्ण न करता आल्यानं अर्णब यांनी त्यांच्याकडे असलेलं काम काढून घेतलं. त्यांना स्टुडिओच्या परिसरात येण्यासही मज्जाव केला. यानंतर गोस्वामींनी स्टुडिओचं काम कोलकात्यातील एका इंटिरियर डिझाईनरकडून पूर्ण करून घेतलं, अशी माहिती सुत्रांनी दिली.