आरोग्य सेतू अ‍ॅपच्या सुरक्षेला दिलं चॅलेंज, हॅकर म्हणतोय राहुल गांधी वॉज राईट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 12:56 PM2020-05-06T12:56:17+5:302020-05-06T13:05:21+5:30

आरोग्य सेतू अॅपच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणाऱ्या हॅकरचे नाव इलियट अँडरसन असे आहे. इलियट हा फ्रान्समधील प्रसिद्ध सुरक्षा तज्ज्ञ (किंवा तांत्रिक भाषेत ज्याला एथिकल हॅकर म्हणतात) आहे.

Arogya Setu app security challenge, french hacker says Rahul Gandhi was right MMG | आरोग्य सेतू अ‍ॅपच्या सुरक्षेला दिलं चॅलेंज, हॅकर म्हणतोय राहुल गांधी वॉज राईट

आरोग्य सेतू अ‍ॅपच्या सुरक्षेला दिलं चॅलेंज, हॅकर म्हणतोय राहुल गांधी वॉज राईट

googlenewsNext

मुंबई - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लागू असलेला लॉकडाऊन केंद्र सरकारनं दोन आठवड्यांनी वाढवला आहे. त्यामुळे १७ मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहील. या कालावधीत ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही सवलती देण्यात येतील. याबद्दलची नियमावली गृह मंत्रालयानं प्रसिद्ध केली आहे. कोरोना विषाणूबद्दलची माहिती देणाऱ्या आरोग्य सेतू अ‍ॅपबद्दल महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना हे अ‍ॅप डाऊनलोड करणं बंधनकारक असेल. देशात जवळपास ९ कोटी नागरिकांनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे. मात्र, या अॅपच्या सुरक्षेबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केला होता. आता, राहुल गांधीं बरोबर बोलत आहेत, असा दावा एका फ्रेंच हॅकरने केलाय. 

आरोग्य सेतू अॅपच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणाऱ्या हॅकरचे नाव इलियट अँडरसन असे आहे. इलियट हा फ्रान्समधील प्रसिद्ध सुरक्षा तज्ज्ञ (किंवा तांत्रिक भाषेत ज्याला एथिकल हॅकर म्हणतात) आहे. याआधीही इलियटने आधारकार्ड अ‍ॅपच्या सुरक्षेसंदर्भात माहिती उघड केली होती. त्याने आता आरोग्य सेतू अ‍ॅपबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्याने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना टॅग करत ते या अ‍ॅपबद्दल बरोबर होते असंही म्हटलं आहे. “हाय, आरोग्य सेतू, तुमच्या अ‍ॅपमध्ये सुरक्षेसंदर्भातील अडचण दिसून आली आहे. ९ कोटी भारतीयांची खासगी माहिती उघड होण्याचा धोका आहे. तुम्ही मला पर्सनल मेसेजवर संपर्क करु शका का? महत्वाची नोंद राहुल गांधी बरोबर होते,” असं ट्विट इलियटने मंगळवारी केलं.

त्यानंतर, भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी आपल्याशी संपर्क साधल्याची माहिती इलियटने दिली. इलियटने ९ कोटी भारतीयांच्या आरोग्यासंदर्भातील माहिती अशी उपलब्ध करुन देणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केलं आहे. “माझ्याकडे खूप कमी संयम आहे. मी एका ठराविक काळानंतर या अ‍ॅपवरील खासगी माहिती उघड करणार आहे,” असा इशाराच इलियटने दिला आहे. “तुम्ही म्हणत आहात की इथे काहीच उघड झालं नाहीय. आपण इथे पाहूयात. मी तुम्हाला उद्या भेटतो,” असंही ट्विट या हॅकरने केलं आहे. त्यामुळे, आरोग्य सेतू अॅपसंदर्भातील गोंधळ अधिकच वाढला असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. 
 

Web Title: Arogya Setu app security challenge, french hacker says Rahul Gandhi was right MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.