कोलकाता: कोट्यवधी रुपयांच्या पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग (WBSSC) भरती अनियमितता घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अर्पिता मुखर्जीच्या आठ बँक खात्यांमध्ये 8 कोटी रुपयांचे व्यवहार उघडकीस आणले आहेत. ईडीने ही खाती गोठवली आहेत. ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, आता ते या बँक खात्यांमधील दुतर्फा पैशांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिल्यांदा या खात्यांमध्ये एवढी मोठी रक्कम कोठून ट्रान्सफर करण्यात आली आणि दुसरे चॅनल, ज्याठिकाणी अशाप्रकारे पैसे वेळेत ट्रान्सफर करण्यात आले होते.
ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "अर्पिता मुखर्जी आणि पार्थ चॅटर्जी यांच्या कोठडीच्या या टप्प्याच्या उर्वरित दिवसांत 3 ऑगस्टपर्यंत आम्ही त्यांची या मुद्द्यावर कसून चौकशी करू. गरज भासल्यास या खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिटही केले जाईल." दरम्यान, रविवारी दुपारी पार्थ चटर्जी यांना कोलकात्याच्या दक्षिणेकडील जोका येथील ईएसआय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी पार्थ चटर्जी यांनी दावा केला की, त्यांच्याकडे कोणतेही पैसे नाहीत. मात्र, जप्त करण्यात आलेल्या प्रचंड रोकड आणि सोन्याचा खरा मालक कोण, असे विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
ईडीने 23 जुलैला दक्षिण कोलकाता येथील टोलीगंज येथील डायमंड सिटी हाऊसिंग कॉम्प्लेक्समधील अर्पिता मुखर्जीच्या फ्लॅटमधून 31.20 कोटी रुपये, तसेच 60 लाख रुपयांचे विदेशी चलन आणि 90 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले. ईडीच्या अधिकार्यांनी 28 जुलै रोजी बेलघरियातील आणखी एका फ्लॅटमधून पुन्हा 27.90 कोटी रुपये किमतीचे भारतीय चलन आणि सोने जप्त केले. ईडीच्या अधिकार्यांनी आधीच दावा केला आहे की, जे काही जप्त केले गेले आहे ते कोट्यावधींच्या घोटाळ्यातील वास्तविक आर्थिक सहभागाचा एक छोटासा भाग आहे. अर्पिता मुखर्जी व्यतिरिक्त पार्थ चॅटर्जी यांचे जावई कल्याणमय भट्टाचार्य आणि त्यांचे मामा कृष्ण चंद्र अधिकारी यापैकी काही कंपन्यांचे संचालक असल्याचे आढळून आले.
कोण आहे अर्पिता मुखर्जी?ईडीच्या छापेमारीमुळे चर्चेत आलेली अर्पिता मुखर्जी ही बांगला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होती. अर्पिता मुखर्जीने आपल्या फिल्म करिअरमध्ये साइड रोल म्हणून काम केले आहे. बांगला सिनेमासोबतच ओडिसा आणि तामिळ सिनेमातही त्यांनी काम केले आहे. अर्पिता मुखर्जीने बांगला सिनेमातील सुपरस्टार प्रोसेनजीत आणि जीत यांचा लीड रोल असणाऱ्या काही सिनेमातही काम केले आहे. अमर अंतरनाड या सिनेमात त्यांनी अभिनय केला आहे. ईडीच्या कारवाईत अर्पिता हिच्या घरी कोट्यवधी रुपये सापडल्याने सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. दरम्यान, अर्पिता मुखर्जी ही मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय आहे. अर्पिता मुखर्जी 2019 आणि 2020 मध्ये पार्थ चॅटर्जी यांच्या दुर्गा पूजा सोहळ्यात प्रमुख चेहरा होती. तेव्हापासून या दोघांची ओळख झाली.