पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात अर्पिता मुखर्जीसमोरील अडचणी आता आणखी वाढू लागल्या आहेत. बुधवारी दुपारी ईडीच्या एका पथकानं अर्पिताच्या आणखी एका घरावर धाड टाकली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार याही घरात मोठ्या प्रमाणावर पैसे आढळून आले आहेत. धाडीत सापडलेली रक्कम इतकी जास्त आहे की ईडीच्या अधिकाऱ्यांना नोटा मोजण्याचं मशीन मागवावं लागलं आहे.
ईडीच्या पथकानं अर्पिताच्या क्लब टाऊन येथील अपार्टमेंटमध्ये धाड टाकली. याही फ्लॅटमध्ये रोकड लपवून ठेवल्याची टीप ईडीला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी धाड टाकली आणि मिळालेली माहिती खरी ठरली. ईडीच्या अधिकाऱ्यांना छाप्यात नोटांचा ठीग सापडला आहे. रोकड नेमकी किती आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पण नोटा मोजण्यासाठीचं मशीन मागवण्यात आलं आहे. आतापर्यंत ईडीनं याप्रकरणात २२ कोटी रुपये जप्त केले आहेत. तसंच परदेशी चलनही जप्त करण्यात आलेलं आहे. गेल्या धाडीत अर्पिताच्या फ्लॅटमधून २० हून अधिक फोन आणि अनेक कंपन्यांची कागदपत्र देखील जप्त करण्यात आली होती.
याच शिक्षक भरती घोटाळ्यात पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक करण्यात आलेली आहे. याप्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे. ब्लॅक डायरीशी संबंधित अनेक सवाल उपस्थित केले गेले आहेत. ही तिच डायरी आहे जी अर्पिताच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांना सापडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ही डायरी पश्चिम बंगाल सरकारच्या Department of Higher And School Education ची आहे. या डायरीत ४० पानं अशी आहेत की यात खूप काही नमूद करण्यात आलेलं आहे.
महत्वाची बाब अशी की ईडीच्या अधिकाऱ्यांना पार्थ चॅटर्जी यांच्या घरातून क्लास सी आणि क्लास डी सेवाच्या भरतीतील उमेदवारांशी संबंधित कागदपत्रं देखील प्राप्त झाली आहेत. समोर आलेल्या पुरव्यांनुसार ग्रूप डी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीत पार्थ चॅटर्जी यांचा सक्रियपणे सहभाग असल्याचं सांगितलं जात आहे.