नवी दिल्ली : अत्यंत कर्मठ अशा सलाफी इस्लामी विचारसरणीचा अवलंब करून जगात इस्लामी सत्ता स्थापन करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘इस्लामी स्टेट’ (इसिस) या निरंकुश दहशतवादी संघटनेच्या एकूण १२७ समर्थकांना सन २०१४ पासून देशाच्या १४ राज्यांमधून अटक केली गेल्याची माहिती ‘राष्ट्रीय तपासी यंत्रणे’ने (एनआयए) दिली आहे.
‘एनआयए’च्या सूत्रांनी सांगितले की, एकूण २८ प्रकरणांमध्ये ही कारवाई करण्यात आली असून त्यासंबंधीचे खटले विविध टप्प्यांवर प्रलंबित आहेत. ‘इसिस’चे सर्वादिक म्हणजे ३३ समर्थक तमिळनाडूतून पकडले गेले. या संघटनेचे १२ हस्तक महाराष्ट्रातून जेरबंद केले गेले.
पकडल्या गेलेल्या या बहुतांश हस्तकांनी ‘इसिस’च्या विखारी प्रचाराला बळी पडून स्थानिक पातळीवर आपापले गट स्थापन केले होते. पण यातील सामायिक दुवा म्हणजे या सर्वांचे सूत्रधार ‘इसिस’च्या खलिफांसाठी काम करणारे विदेशी होते. तपासातून एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली ती अशी की, दहशतवादी विचारांनी तरुणांची माथी भडकाविणे, त्यांची भरती करणे, प्रशिक्षण देणे, त्यांना विविध प्रकारची कामे नेमून देणे व प्रत्यक्षात ती कामे करून घेणे या सर्वांसाठी ‘इसिस’च्या म्होरक्यांनी इंटरनेटचा फार प्रभावीपणे वापर केला. भारतातील व परदेशातील इस्लामी धर्मप्रचारकांची इंटरनेटवर उपलब्ध असलेली भाषणे ऐकून आपण ‘इसिस’च्या प्रभावाखाली आल्याची कबुली अटक झालेल्या सर्वांनीच दिली. त्यापैकी अनेकांनी आता परागंदा होऊन मलशियात वास्तव्य करणारे धर्मप्रचारक व ‘इस्लामिक रीसर्च फौंडेशन’चे संस्थापक डॉ. झाकिर नाईक यांच्या भाषणांनी प्रभावित झाल्याचा उल्लेख केला. नाईक यांच्याविरुद्ध भारतात खटले सुरु आहेत.अटक संख्यातमिळनाडू ३३उत्तर प्रदेश १९केरळ १७तेलंगणा १४महाराष्ट्र १२कर्नाटक ८दिल्ली ७उत्तराखंड ४प. बंगाल ४जम्मू-काश्मीर ३राजस्थान २गुजरात २बिहार १मध्य प्रदेश १