नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडियन मुजाहिदिन या दहशतवादी संघटनेच्या एका म्होरक्यास अटक केली. कर्नाटकच्या भटकळ येथील रहिवासी अब्दुल वाहीद सिद्दिबापा याला दुबईहून येथे पोहोचताच अटक करण्यात आल्याची माहिती एनआयएच्या अधिकाऱ्याने दिली. अब्दुल वाहीद दुबईत राहात होता आणि भारतात दहशतवादी कारवायांसाठी इंडियन मुजाहिदिनमध्ये दहशतवाद्यांची भरती करीत होता. याशिवाय येथील दहशतवाद्यांना तो आर्थिक मदतही करीत होता. भारतात विविध ठिकाणी हल्ले घडवून आणण्याच्या मुजाहिदिनच्या एका कटप्रकरणात पोलीस त्याच्या शोधात होते. अब्दुलला एका अटक वॉरंटच्या आधारे अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस यापूर्वीच जारी करण्यात आली आहे. अब्दुलच्या अटकेबाबत सविस्तर माहिती देण्यास नकार देताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले की, एनआयएला त्याच्याबद्दल काही सूचना मिळाली असेल. त्यामुळेच त्याला अटक करण्यात आली. तपास संस्था त्यांचे कर्तव्य पार पाडत असतात आम्ही त्यावर टिपणी करण्याची गरज नाही. (वृत्तसंस्था)
इंडियन मुजाहिदीनच्या म्होरक्यास अटक
By admin | Published: May 21, 2016 4:30 AM