महिलेला लुटणाऱ्यास अटक
By admin | Published: August 23, 2015 8:40 PM
(फोटो)
(फोटो)महिलेला लुटणाऱ्यास अटकबुटीबोरी पोलिसांची कारवाई : साडेसात लाखांचा ऐवज जप्तबुटीबोरी : महिलेस कारमध्ये लिफ्ट देऊन तिच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्यास बुटीबोरी पोलिसांची नुकतीच अटक केली. त्याच्याकडून कार व सोन्याच्या दागिन्यांसह एकूण ७ लाख ४१ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अनू राज खन्ना (३४, रा. कन्नमवार वॉर्ड, बल्लारशा, जिल्हा चंद्रपूर) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव असून, त्याने दागिन्यांची दीपक काशिराम जवनेकर (४४, रा. राष्ट्रवादीनगर, चंद्रपूर) याच्या मदतीने विल्हेवाट लावल्याने त्यालाही अटक करण्यात आली. फिर्यादी प्रतिभा नीळकंठ मरघडे रा. महाल, नागपूर या शिक्षिका असून, त्यांना २२ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास बुटीबोरी एमआयडीसी चौकातून नागपूरला यायचे होते. त्यावेळी अनू खन्ना याने त्यांना त्याच्या कारमध्ये लिफ्ट दिली. नागपूरला येण्याऐवजी त्याने कार जामठा स्टेडियमसमोरील रिंगरोडवर नेली आणि तेथील उड्डाण पुलाजवळ थांबवून मरघडे यांच्याकडील ८० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, सहा हजार रुपयांचा मोबाईल हॅण्डसेट व ३०० रुपये रोख हिसकावून मरघडे यांना तिथे सोडून वाकेश्वरच्या दिशेने पळ काढला होता. दरम्यान, बुटीबोरी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अन्नूला बल्लारशा येथून ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली देताच पोलिसांनी त्याने वापरलेली एमएच-३४/एएम-००८७ क्रमांकाची सोन्याच्या बांगड्या पंजाबातील जालंधर येथे राहणाऱ्या त्याच्या बहिणीच्या घरून जप्त केल्या. उमरेड (जिल्हा), कारंजा लाड (जिल्हा वाशीम), समुद्रपूर (जिल्हा वर्धा) या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे लुटमार केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यातील सोन्याचे दागिने त्याने दीपक जवनकर याच्या मदतीने गहाण ठेवल्याने सांगताच त्यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १ लाख १० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, ५५ हजार २०० रुपये किमतीचे मंगळसूत्र व कानातील टॉप्स तसेच ९६ हजार रुपये किमतीचे इतर दागिने जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)***