बंगळुरू - रामजन्मभूमी आंदोलनातील एका कार्यकर्त्यास पोलिसांनी अटक केल्यामुळे कर्नाटकमध्येभाजपा आक्रमक झाली आहे. येथील हुबळी शहर पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली. या अटकेविरुद्ध भाजपा रस्त्यावर उतरली असून भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनात स्वत:हून जात जेलभरो आंदोलन सुरू केले. त्यावरुन, काँग्रेसने भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. स्वत: मुख्यंत्री सिद्धरमैय्या यांनीही भाजपवर निशाणा साधला. आरोपींना जात अन् धर्माचं लेबल लावणं अत्यंत भयानक आहे, असे सिद्धरमैय्या यांनी म्हटले आहे.
रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी होत सन १९९२ साली केलेल्या आंदोनलावरुन श्रीकांत पुजारी नामक व्यक्तीला कर्नाटकमधील हुबळी पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेवरुन कर्नाटक भाजपा आक्रमक बनली असून राज्यभर आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. कर्नाटकमधील भाजपा नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते आर. अशोका म्हणाले की, काँग्रेस सरकार गुंडगिरी करत आहे. राम मंदिराचे उद्घाटन होत असल्याने ते हिंदू कार्यकर्त्यांना अटक करत आहेत. काँग्रेसकडून हे गलिच्छ राजकारण होत आहे", असा आरोप अशोका यांनी केला. त्यावर, आता मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे.
भाजपाने कर्नाटकात गेली ४ वर्षे कुशासन आणि भ्रष्टाचार, घोटाळ्यात घालवली. मात्र, काही दिवसांतच काँग्रेस सरकारचं चांगलं काम आणि लोकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपावाले घाबरले आहेत. आपल्या निराधार आरोपांचे नेतृत्त्व करण्यासाठी हुबळीतील एका आरोपीच्या अटकेवरुन गोंधळ घालत आहेत. भाजपा नेत्यांना हे समजले पाहिजे की, आरोपींना कुठलाही धर्म नसतो.
राज्यात जेव्हा भाजपाचं सरकार होतं, तेव्हाही लोकायुक्त पोलिसांनी मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांना अटक केली होती. त्यांना तुरुंगात टाकले होते. हुबळीतील हा आरोपी तत्कालीन मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांच्यापेक्षाही मोठा आहे का? मग तेव्हा सरकार हिंदूविरोधी होती का?. त्यावेळी, भाजपाच्या मातृसंघटनेतील नेत्यांनीही हिंदू येदीयुरप्पा यांना अटक करणाऱ्या तत्कालीन सरकारला हिंदूविरोधी म्हटलं नाही ना, मग आत्ताच हा गोंधळ कशासाठी?, असा सवाल येदीयुरप्पा यांनी विचारला आहे.