नवी दिल्ली - तालिबानने ज्या पद्धतीने काबुलवर आक्रमण करुन राष्ट्रपती भवन ताब्यात घेतलं. संपूर्ण अफगाणिस्तानवर आपली सत्ता काबिज केल्याचंही जाहीर केलं. त्यावरुन, जगभरात खळबळ उडाली आहे. त्यातच, जवळपास 5 देशांनी तालिबानी सरकारला समर्थन केलं असून भारताच्या सीमारेषेवरील चीन, बांग्लादेश आणि पाकिस्तानचा यात समावेश आहे. त्यामुळे, भारतासोबत तालिबाचे संबंध कसे असतील, यावर चर्चा झडत आहेत. त्यातच, अनेक भारतीय सेलिब्रिटीही आपलं मत व्यक्त करत आहेत. अभिनेत्री स्वरा भास्कर एका विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
स्वरा भास्कर ट्विटरवरील आपल्या कमेंटमुळे सातत्याने चर्चेत असते. अनेकदा नेटीझन्सकडून तिला ट्रोलही करण्यात येते. तर, अनेकजण तिच्या विचारांचे, विधानांचे समर्थनही करतात. नुकतेच स्वराने अफगाणिस्तानमधील घडामोडींवर भाष्य करताना, तालिबानी दहशतवाद्यांची तुलना हिंदुत्ववाद्यांशी केली आहे. त्यानंतर, सोशल मीडियावर स्वराला ट्रोल करण्यात येत आहे. स्वरा भास्करला अटक करण्याची मागणीही नेटीझन्सने केली आहे. ट्विटरवर #ArrestSwaraBhaskar हा ट्रेंड सुरू झाला आहे.
आम्ही हिंदुत्वात दहशतवादासोबत ठीक असूच शकत नाही आणि आम्ही तालिबानी आतंकी हल्ल्याने तुटलो असून आम्हाला मानसिक धक्का बसला आहे. आम्ही तालिबानच्या दहशवादाने शांत राहू शकत नाही, आणि आम्ही सर्वच हिंदू्त्वाच्या दहशतावादाने नाराज आहोत. आमचे मानवी आणि नैतिक मूल्य हे पीडित किंवा उत्पीडीतच्या ओळखीवर अवलंबून आहे, असे ट्विट स्वराने केले आहे. स्वराने आपल्या ट्विटमध्ये हिंदुत्वाची तुलना तालिबानी दहशवादाशी केल्याने नेटीझन्स चांगलेच खवळले आहेत.