नवी दिल्ली - दिल्ली मद्य धोरण प्रकरणात भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा हात असून, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण या प्रकरणात कारस्थान रचून अटक करण्यात आल्याचा आरोप शुक्रवारी आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते खासदार संजय सिंह यांनी केला.
या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ईडीने खासदार मगुंटा रेड्डी आणि त्यांचे वडील राघव रेड्डी यांना केजरीवाल यांच्याविरोधात दबावाखाली जबाब नोंदविण्यास भाग पाडल्याचा आरोप संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रेड्डी यांचे छायाचित्र दाखवले आणि हेच रेड्डी आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या तेलुगू देसमची उमेदवारी मिळवून लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या नावावर मते मागत आहेत, असे संजय सिंह म्हणाले. ईडीने अटक केल्यानंतर सहा महिने तुरुंगवास भोगून संजय सिंह बुधवारीच जामिनावर बाहेर आले आहेत. त्यानंतर त्यांनी भाजपविरोधात टीकास्त्र सोडले आहे.
सहा जबाबांमध्ये नाव का घेतले नाही? - मगुंटा रेड्डी यांनी तीनवेळा, तर त्यांचे पुत्र राघव मगुंटा यांनी सातवेळा जाबजबाब दिले. केजरीवाल यांना ओळखता का, असे ईडीने १६ सप्टेंबर रोजी मगुंटा रेड्डी यांना विचारले.- आपली केजरीवाल यांच्याशी भेट झाली, पण एका ट्रस्टच्या जमिनीच्या संबंधात, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर ईडीने त्यांच्या मुलाला अटक केली आणि पाच महिने तुरुंगात डांबल्यानंतर मगुंटा रेड्डी यांनी आपला जबाब बदलला. - १० फेब्रुवारी ते १६ जुलैदरम्यान ईडीने घेतलेल्या सातपैकी सहा जबाबांमध्ये राघव मगुंटांनी केजरीवाल यांचे नाव घेतले नाही, पण त्यांनी सातवा जबाब बदलून केजरीवाल यांचे नाव घेतले आणि त्या आधारे केजरीवाल यांना अटक करण्यात आली, असा आरोप संजय सिंह यांनी केला.
लवकरच तुरुंगाबाहेर येणार : सिसोदियांचे यांचे पत्र आपला चौदा महिन्यांचा तुरुंगवास लवकरच संपेल, असा विश्वास व्यक्त करीत आज आम आदमी पार्टीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एका पत्राद्वारे दिल्लीतील पटपडगंज विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या मतदारांचे आभार मानले आहे. आम्ही सर्वांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केले आहे. स्वातंत्र्यलढ्याप्रमाणेच आम्ही चांगले शिक्षण आणि शाळांसाठी लढत आहोत, असे त्यांनी म्हटले.
आतिशी यांना नोटीसनिवडणूक आयोगाने दिल्लीच्या मंत्री आतिशी यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. भाजपने पक्षात प्रवेश करण्यास सांगितले होते, अन्यथा ईडीकडून अटक केली जाईल या वक्तव्याबाबत पुरावे सादर करावेत, असे नोटिशीमध्ये म्हटले आहे. आतिशी यांच्या या विधानाविरोधात भाजपने एक दिवस आधी आयोगाकडे धाव घेतली होती. नेते जे काही बोलतात त्यावर मतदार विश्वास ठेवतात, असे आयोगाने म्हटले.
पक्षासाठी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सर्वोत्तम व्यक्तीदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या सध्याच्या परिस्थितीत पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी सर्वोत्तम व्यक्ती आहेत आणि त्यांच्या उपस्थितीचा कार्यकर्त्यांवर सकारात्मक परिणाम झाला आहे.- सौरभ भारद्वाज, नेते,आप