पश्चिम बंगालमधील कोलकात्यातून सोमवारी पोलिसांनी स्वत:ला सीबीआय अधिकारी म्हणवणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली होती. दरम्यान, तो २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आलेल्या १० व्या ब्रिक्स समिटमध्ये सहभागी झाला होता अशी माहिती पोलीस तपासातून समोर आल्याचं समोर आलं होतं. या ब्रिक्स समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सहभागी झाले होते.
बनावट अधिकारी सनातन रॉय चौधरी हा २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ब्रिक्स संमेलनात सामिल झाल्याचं पोलीस तपासातून समोर आल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. या संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील उपस्थित होते. या संमेलनाचे काही फोटोही पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामध्ये सनातन रॉय चौधरी हादेखील दिसत आहे. स्वत:ला कथितरित्या सीबीआय अधिकारी सांगणाऱ्या आणि निळ्या दिव्याच्या गाडीत फिरण्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रॉय याला अटक केली होती.
तो निळ्या दिव्याच्या गाडीतून शहरात फिरत होता. पोलिसांनी जेव्हा त्याला तपास नाक्यावर थांबवलं तेव्हा अशा प्रकारे का फिरत आहे या प्रश्नाचं उत्तर त्याला देता आलं नाही. त्यानंतर त्याचं वाहन जप्त करण्यात आलं. त्यावर सीबीआय आणि अधिवक्ता असा स्टीकर लावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. "अटक करण्यात आलेल्या व्यक्तीनं आपण सीबीआयशी निगडीत प्रकरणांत राज्य सरकारचं प्रतिनिधीत्व केल्याचं म्हटलं आहे," असंही पोलिसांनी सांगितलं.