नवी दिल्ली : यंदा केरळमध्ये मान्सून ४ जून रोजी दाखल होईल, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने मंगळवारी व्यक्त केल्यानंतर भारतीय हवामान विभागाने मान्सूनचे आगमन ६ जून रोजी म्हणजे आणखी दोन दिवस उशिरा होईल, असे बुधवारी जाहीर केले. अर्थात चार दिवस मागेपुढे होऊ शकतात, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन १ जून रोजी होते. त्यानंतर एका आठवड्याने तो मुंबईत येतो.केरळच्या समुद्रकिनाऱ्यावर मान्सून गेल्या वर्षी २९ मे रोजी तर २0१७ मध्ये ३0 मे रोजी धडकला होता. त्यापेक्षा एक आठवडा उशिरा यंदा मान्सून दाखल होईल, असे दिसते. परिणामी, तो मुंबईत यायला विलंब होईल आणि महाराष्ट्रात तो जूनच्या अखेरीस वा जुलैमध्ये दाखल होईल, असे दिसत आहे. हवामान विभागाने संपूर्ण मोसमात मिळून सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. एप्रिल महिन्यातही हवामान विभागाने ९६ टक्के पावसाचाच अंदाज व्यक्त केला होता.भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, साधारणपणे एक आठवडा विलंबाने मान्सून भारतात दाखल होईल. केरळमध्ये आल्यानंतर सुमारे एका आठवड्याने मान्सूनचे मुंबईत आगमन होते. म्हणजे मुंबईत मान्सून जूनच्या दुसºया आठवड्यात दाखल होईल. यंदाचा मान्सून सर्वसाधारण असेल, असा समाधान देणारा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या वर्षी सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता आहे. स्कायमेटने ९२ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता.समाधानाची आणखी एक बाब म्हणजे अल निनोचा प्रभाव कमी असेल व पावसाचा हंगाम सुरू होताच तो प्रभाव आणखी कमी होईल, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
१३ वेळा वर्तविला अचूक अंदाजमान्सूनच्या आगमनाबद्दलचे गेल्या १४ वर्षांपैकी १३ वेळा भारतीय हवामान विभागाचे अंदाज खरे ठरले आहेत. केवळ २0१५ साली आमचा अंदाज चुकला होता, असे हवामान खात्याने स्वत:च म्हटले आहे. त्या वर्षी २९ मे रोजी मान्सून केरळात दाखल होईल, असे हवामान खात्याने म्हटले होते. प्रत्यक्षात ५ जून रोजी तो केरळच्या समुद्रकिनाºयावर धडकला होता.