PM Modi with Deepjyoti : दिल्लीतील ७, लोककल्याण मार्गावर असलेल्या पंतप्रधान निवासात एका नव्या सदस्याचे आगमन झाले. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत माहिती दिली. पंतप्रधान निवासात असलेल्या गाईने वासराला जन्म दिला. या वासराचे नाव पंतप्रधान मोदींनी दीपज्योती असे ठेवले असून, त्यामागचे कारणही सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओ आणि काही फोटो पोस्ट केले आहेत. 'दीपज्योती खूपच सुंदर आहे', असे मोदींनी फोटो पोस्ट करताना म्हटले आहे.
मोदींनी दीपज्योती नाव का ठेवले?
पंतप्रधानांनी व्हिडीओ पोस्ट करताना दीपज्योती नाव का ठेवले, याबद्दलही सांगितले आहे.
"आपल्या शास्त्रांमध्ये म्हटले गेले आहे की, "गाव: सर्वसुख प्रदा:" (गाय सर्व प्राण्यांची आई आहे.) लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधान निवास कुटुंबात एका नवीन सदस्याचे आगमन झाले आहे. पंतप्रधान निवासात असलेल्या गोमातेने एक वासराला जन्म दिला आहे. तिच्या कपाळावर ज्योतीचे निशाण आहे. त्यामुळे मी तिचे नाव दीपज्योती ठेवले आहे", असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींना प्राण्यांविषयी प्रेम आहे. अधूनमधून ते पंतप्रधान निवासातील प्राण्यांसोबत वेळ घालवत असतात. पंतप्रधान निवासमधील गार्डनमध्ये मोर आहेत. त्यांच्यासोबतचे फोटोही पंतप्रधानांनी शेअर केले होते. त्याचबरोबर पंगनूर गायींसोबतही वेळ घालवताना मोदी दिसले होते.