नवी दिल्ली - सुरक्षा व्यवस्था अधिक कोटेकोर करण्यासाठी आता रेल्वे स्थानकांवरही विमानतळांसारख्या सुरक्षा प्रणाली लागू करण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, प्रवाशांना ट्रेन पकडण्यासाठी 20 मिनिटांपूर्वीच स्थानकावर पोहोचावे लागणार आहे. जेणेकरुन सुरक्षा तपासणीची प्रक्रिया योग्यरितीनं पार पाडण्यास रेल्वे प्रशासनाला मदत होईल. हाय अँड टेक्नोलॉजीसहीत ही व्यवस्था सध्या अलाहाबाद रेल्वे स्थानकावर लागू करण्यात आली आहे. कारण या स्थानकावर कुंभमेळ्यादरम्यान मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. शिवाय, या महिन्यापासूनच कुंभ मेळ्याची सुरुवात होत आहे.
(रेल्वेमध्ये बिल मिळालं नाही तर जेवण मोफत)
याव्यतिरिक्त कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकावरही ही व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. या दोन्ही स्थानकांवर पायलट प्रोजेक्टच्या स्वरुपात ही प्रणाली लागू केली जाईल. यानंतर देशातील तब्बल 202 स्थानकांवरही याच प्रकारच्या सुरक्षा योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. यासंदर्भातील माहिती रेल्वे प्रॉटेक्शन फोर्सचे डीजीपी जनरल अरुण कुमार यांनी दिली आहे.
(रेल्वे प्रवाशांचा जीव वाचविणाऱ्या ‘त्या’ देवदूतांचा व्हीजेटीआयकडून गौरव)
या योजनेअंतर्गत, रेल्वेकडून स्थानकं सील करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला स्थानकांच्या सर्व प्रवेशद्वारांची पडताळणी होणार. या तपासणीअंतर्गत कोणते प्रवेशद्वार बंद करायचे, हे निश्चित करण्यात येईल. काही ठिकाणी रेल्वे स्थानकांवरील प्रवेशद्वार भिंतींद्वारे बंद करण्यात येतील आणि काही स्थानकांवर प्रवेशद्वारांची सुरक्षा तपासणीची जबाबदारी रेल्वे प्रोटेक्शन फोर्सकडे सोपवण्यात येणार आहे.
अरुण कुमार यांनी पुढे असेही सांगितले की, 'प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर सुरक्षा तपासणी केली जाणार. मात्र, प्रवाशांना येथे तासाभरापूर्वी येण्याची आवश्यकता नाही. पण ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांना 15 ते 20 मिनिटांपूर्वीच स्थानकावर हजर राहावं लागणार आहे. जेणेकरुन सुरक्षा तपासणीची प्रक्रिया पार पाडण्यात कोणतेही अडथळे येणार नाहीत.