ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ११ - श्री श्री रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेने राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावलेला 5 कोटींचा दंड भरण्याची तयारी दाखवली आहे. दंड भरण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे 3 आठवड्यांची मुदत मागितली आहे. इतका पैसा लगेच उभा करणं शक्य नसल्याने आम्हालामुदत देण्यात यावी अशी विनंती आर्ट ऑफ लिव्हींगने केल्यानंतर ती मान्य केली आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने तुम्ही आता किती डिपॉझिट भरु शकता अशी विचारणा केली असता आर्ट ऑफ लिव्हींगने 25 लाख भरु शकतो असं सांगितलं आहे. तर उरलेली रक्कम भरण्यासाठी 3 आठवड्यांची मुदत द्यावी अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय हरित लवादाने ही मागणी केली आहे. ही रक्कम दंड म्हणून नाही तर पर्यावरणाची भरपाई म्हणून घेत असल्याचं राष्ट्रीय हरित लवादाने स्पष्ट केलं आहे.
श्री श्री रवीशंकर यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणीदेखील राष्ट्रीय हरित लवादाने नाराजी दर्शवत अशा प्रकारचं वक्तव्य रवीशंकर यांच्यासारख्या व्यक्तीला शोभत नाही असं म्हटलं आहे. दिल्लीमध्ये यमुना नदीच्या किनाऱ्यावर महोत्सव आयोजित केल्यामुळे पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल लवादाने ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने शुक्रवारी 5 वाजेपर्यंत 5 कोटींचा दंड भरण्याची मुदत दिली होती अन्यथा कारवाईचा इशारा दिला होता. श्री श्री रवीशंकर यांनी एक रुपयाही दंड भरणार नाही, प्रसंगी जेलमध्ये जाऊ असं वक्तव्य केलं होतं. अखेर माघार घेत आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेने दंड भरण्याची तयारी दाखवली आहे.