ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १५ - श्री श्री रवीशंकर यांच्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग'ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चोरांनी आपले कलागुण सादर करत 'आर्ट ऑफ स्टिलिंग'चं प्रात्यक्षिकच देऊन टाकलं. या जागतिक सांस्कृतिक महोत्सवात चोरीच्या एकूण 72 तक्रारी आल्या आहेत. यामध्ये पैसे, मोबाईल, लॅपटॉप, पाकिट, ओळख कागदपत्रे चोरी झाल्याची तक्रार आहे. पोलिसांनी याप्रकरणी 30 पाकिटमार आणि चोरांना अटक केली आहे. यामध्ये 3 महिलांचादेखील समावेश आहे.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार यमुनेच्या तीरावर आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमात चोरांनी आपले हात चांगलेच धुवून घेतले आहेत. सनलाइट पोलीस कॉलनीत 72 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चोरांनी देवाची मुर्तीदेखील सोडलेली नाही. कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या स्टॉलवरुन गणपतीची मुर्तीदेखील चोरी झाल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे.
रशियाहून आपली कला सादर करण्यासाठी आलेल्या 29 वर्षीय तरुणीलादेखील याचा फटका बसला. तिच्या परफॉर्मन्सआधीच ग्रीन रुममधून तिची बॅग चोरीला गेली. त्या बॅगमध्ये तिचे सगळे कपडे आणि दागिने होते. त्यामुळे नाव पुकारूनदेखील परफॉर्मन्स करु न शकणा-या या तरुणीकडे रडण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता.
अटक करण्यात आलेले सर्वजण उत्तरपुर्व दिल्लीमधील तसंच उत्तरप्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि हरियाणामधील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत असून चोरी गेलेले सामान परत मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पोलीस उपायुक्त मनदीप सिंग रंधावा यांनी दिली आहे.
श्री श्री रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगने आयोजित केलेल्या या जागतिक सांस्कृतिक महोत्सवावरुन अगोदरच गदारोळ झाला होता. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने आर्ट ऑफ लिव्हिंगला 5 कोटींचा दंड ठोठावला होता. मात्र आर्ट ऑफ लिव्हिंगने तो भरण्यास नकार दिला होता. शेवटी आर्ट ऑफ लिव्हिंगने माघार घेत दंड भरण्याची तयारी दर्शवली होती. राष्ट्रीय हरित लवादाने शेवटच्या मोक्याला 25लाख भरण्याची अट घालत या कार्यक्रमाला परवानगी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्धाटन करण्यात आलं होतं.