हैदराबाद : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचे जगभरात अनेक चाहते असतील. मात्र, या चाहत्यांमध्ये शाहरुख खानची एक खास चाहती आहे. ती म्हणजे सोफिया. कृत्रिम बुद्धिमत्ता लाभलेली ती जगातील पहिली चालती-बोलती रोबो आहे. हैदराबादमध्ये आयटी वर्ल्ड कॉंग्रेसच्या कार्यक्रमात मंगळवारी सोफिया दाखल झाली होती. या कार्यक्रमात प्रश्नांना उत्तरे देताना तिने शाहरूख खान आपला बॉलिवूडमधील आवडता अभिनेता असल्याचे सांगितले. यावेळी तिच्या या उत्तरानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि उपस्थितांनी सोफियाचे कौतुकही केले.
सोफिया नेमकी कोण?धातूचे तुकडे आणि तारांपासून बनलेली एक रोबो आहे. विचार करायची क्षमता असलेली, निर्णय क्षमता असलेली, कृत्रिम बुद्धिमत्ता लाभलेली चालती-बोलती रोबो असून तिला सोफिया असे नाव देण्यात आले आहे. सौदी अरेबियाने सोफियाला नागरिकत्व बहाल केले आहे. एखाद्या रोबोला नागरिकत्व देणारा सौदी अरेबिया जगातला पहिला देश आहे. हाँगकाँगच्या हॅनसन रोबॉटिक्सने सोफियाची निर्मिती केली आहे. माणसांप्रमाणेच सोफिया आपल्या भावना व्यक्त करू शकते.
सोफियाचा लग्नाला नकार! मुंबईतील एका आयोजित कार्यक्रमात सोफियाला येथील निवेदिकेने असे विचारले होते की, समजा मी पुरुष आहे आणि तुला लग्नाची मागणी घातली तर तुझी प्रतिक्रिया काय असेल? त्यावर सोफिया स्मित हास्य करीत म्हणाली, मी नम्रपणे नकार देईन. मात्र तुमच्या ‘प्रपोज’बद्दल धन्यवाद !.