उत्तर प्रदेशातील आग्रा येथे कपाटातील लॉकर दुरुस्त करण्यासाठी आलेल्या कारागिरांनी सुमारे 40 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. दोघेही घरात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. दोन्ही व्यक्तींचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दोघांनाही लवकरच अटक करण्यात येईल.
शाहगंज पोलीस ठाण्याच्या अर्जुन नगरमध्ये ही घटना घडली. या ठिकाणी राहणारा सोनू भदौरिया याची डेअरी आहे. तो अनेक वर्षांपासून शाहगंज परिसरात डेअरीचं काम करत आहे. सोनूने सांगितलं की, त्याची बहीण मुलांना ट्यूशनला सोडण्यासाठी गेली होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घरी परतत असताना सायकलवर दोन जण दिसले. दोघे जण चावीवाला असल्याचं सांगत होते.
कपाटाच्या लॉकरची चावी हरवली होती. त्यामुळे चावी बनवणाऱ्यांना बहिणीने घरी आणलं. कारागीर लॉकरची चावी बनवत असताना आई शकुंतला बेडवर बसली होती. दोन तरुणांपैकी एकाने आईशी बोलणे सुरू करून तिचं लक्ष मुद्दाम दुसरीकडे वळवलं. त्यानंतर दुसऱ्या तरुणाने लॉकरमध्ये ठेवलेले दागिन्यांनी भरलेले दोन स्टीलचे डबे चोरले.
कारागिरांनी चावी बनवल्यानंतर दोन तासांनी लॉकर उघडण्यास सांगितलं. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काही पैसे काढण्यासाठी लॉकर उघडले असता आईला मोठा धक्का बसला. लॉकरमधून दागिन्यांचे दोन्ही डबे गायब होते. लॉकरमधून सोन्याच्या अंगठ्या, एक हिऱ्याची अंगठी, 6 सोन्याच्या बांगड्या, एक नेकलेस, एक सोन्याचा पेंडेंट, कानातले असे अंदाजे 35 ते 40 लाख रुपये किंमतीचे दागिने गायब होते. पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.