बेळगाव (बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी, स्मिता तळवलकर रंगमंच) : चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून तेच तेच चेहरे पुढे येत आहेत. सेलिब्रेटींनी ओव्हर एक्स्पोजर टाळावे अशी विनंती करती जाणत्या तसेच नव्या कलाकरांनी रियाज म्हणून दरवर्षी एकतरी नाटक करावे, अशी अपेक्षा ९५व्या अखिल भारतीय मराठी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा, ज्येष्ठ अभिनेत्री फैय्याज शेख यांनी व्यक्त केली.मावळते अध्यक्ष अरुण काकडे यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे हाते घेतल्यानंतर त्यांनी कलावंत आणि नाट्य रसिकांशी संवाद साधला. बालरंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमीचा त्यांनी भाषणात आढावा घेतला. त्या म्हणाल्या, ‘‘बालरंगभूमीसाठी आज संहिताच उपलब्ध होत नाही. ८ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना टिव्हीसमोरुन वळविले पाहिजे. मुलांची आवड निवड काय आहे, हे पालकांनी समजून घेतले पाहिजे. काही संस्था बालनाट्याची चळवळ राबवित आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. ही मुले एखाद-दुसऱ्या कार्यक्रमातून महागायक किवा महागायिका होण्याचे स्वप्न बघतात. पण या मुलांनी आधी गाण्यातील शास्त्र समजून घेतले पाहिजे. बालरगंभूमीला अनुदान मिळण्यासाठी नाट्य परिषदेने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रायोगिक रंगभूमीबाबत आशादायी असल्याचे त्या म्हणाल्या. कारण प्रायोगिक रंगभूमीतून समाजाच प्रतिबिंब उमटते. संगीत रंगभूमीवर सध्या काही घडताना दिसत नाही. जुने तेच चांगले म्हणून जुन्या नाटकांचे प्रयोग केले जातात. या रंगभूमीवरील कलाकरांनी गद्य नाटक केले पाहिजे. पूर्वीच्या काळातील नाटके आज चालत नाहीत. नाट्य संगीत गाणारे कलाकार आहेत , पण त्यांच्याकडे अभिनय नाही. अभिनय आहे त्यांच्याकडे गाणे नाही. गाणे आणि अभिनय आहे त्यांच्याकडे व्यक्तिमत्त्व नाही, अशी परिस्थिती आहे.प्रभाकर पणशीकर यांचे उदाहरण देऊन व्यावसायिक नाटके खेडोपाडी गेली पाहिजेत अशी अपेक्षा फैय्याज यांनी व्यक्त केली. निर्मात्यांनी थोडी तोशीश सोसावी असेही त्या म्हणाल्या. व्यावसायिक नाटक दिवाणखान्यातून बाहेर यायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (खास प्रतिनिधी)मराठी रंगभूमी ही विशाल वटवृक्षासारखी आहे. तिला अनेक शाखा आहेत, मुळं आहेत. त्यामुळे नाट्यवृक्ष चैतन्याने सळसळतो आहे. ही भारतीय संस्कृतीची परंपरेची आहेत. एकच इच्छा आहे की ही मराठी रंगभूमी सर्वार्थाने समृद्ध, संपन्न,आशयघन व्हावी. लौकिक त्रिखंडात व्हावा.- फैय्याज शेख, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
कलाकारांनी एक तरी नाटक करावे
By admin | Published: February 08, 2015 2:40 AM