राहुल गांधींनी मास्टर्स न करता एम. फिल कसं काय केलं; जेटलींचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 04:41 PM2019-04-13T16:41:08+5:302019-04-13T16:52:04+5:30
काँग्रेसच्या टीकेनंतर भाजपाने पलटवार करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पदवीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात अमेठी मतदार संघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपाच्या उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुन्हा शैक्षणिक पात्रतेवरून वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात आपण ग्रॅज्युएशन पूर्ण केले नाही, असे नमूद केले आहे. यावरुन काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या टीकेनंतर भाजपाने पलटवार करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पदवीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मास्टर डिग्री (एमए) केलेले नाही. त्यांच्याकडे मास्टर डिग्री नसताना त्यांनी एम. फिल कसे केले असा सवाल केला आहे. राहुल गांधी यांनी 2004 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या माहितीपत्रात ट्रिनिटी महाविद्यालयातून डेवलपमेंट इकोनॉमिक्स या विषयात एम. फिल केल्याचे सांगितले होते. तर 2014 च्या माहितीपत्रात डेवलपमेंट स्टडीजमधून एम. फिल केल्याचे नमूद केले आहे. त्यांनी नेमके कोणत्या विषयात एम. फिल केले आहे, ते स्पष्ट करावे असे अरुण जेटली यांनी म्हटले आहे.
‘इंडियाज अपोजिशन इज ऑन ए रेंट कॉज कँपेन’ या हेडिंगने लिहिलेल्या ब्लॉगमध्ये जेटली यांनी राहुल यांच्या पदवीबाबतच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. निवडणूक प्रचारात फक्त स्मृती इराणी यांच्या पदवीची चर्चा होत आहे. मात्र, राहुल यांच्या पदवीबाबत कोणताही प्रश्न विचारण्यात येत नसल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. राहुल गांधी यांच्या शैक्षणिक पदवीबाबत अनेक सवाल उपस्थित होत आहेत, त्याची उत्तरे मिळाली नसल्याचेही त्यांनी सांगितले. राहुल यांनी मास्टर डिग्री नसताना एम. फिल कसे केले हा महत्त्वाचा सवाल असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
स्मृती इराणी या अमेठी मतदार संघातून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. 2014 मध्येही त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना चांगलीच टक्कर दिली होती. स्मृती इराणी यांनी त्यावेळी 23 दिवसांचा प्रचार करत 3 लाख मते मिळवली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही स्मृती इराणी यांनी पुन्हा राहुल गांधींना आव्हान दिले आहे.
'...क्योंकि मंत्री भी कभी ग्रेजुएट थीं', स्मृती इराणींच्या पदवीवरून काँग्रेसचा निशाणा
काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या टीव्ही सिरिलच्या थीम लाईनवरुन स्मृती इराणी यांना लक्ष केले होते. प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, 'क्वालिफिकेशन के भी रूप बदलते हैं, नए-नए सांचे में ढलते हैं, एक डिग्री आती है, एक डिग्री जाती है, बनते एफिडेविट नए हैं'!... तसेच, आता एक नवीन टीव्ही सिरीयल येणार आहे. या सिरियलची ओपनिंग लाइन 'क्योंकि मंत्री भी कभी ग्रेजुएट थीं' अशी असणार असल्याचे सांगत प्रियंका चतुर्वेदी यांनी स्मृती इराणी यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे शिक्षण, त्यांची पदवी कायमच वादात राहिली आहे. पाच वर्षांपूर्वी स्मृती इराणी यांनी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून मोठा वाद झाला होता. आपण परदेशातील येल विद्यापीठातून ग्रॅज्युएट असल्याचे स्मृती इराणी यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले होते.