तिरुवनंतपूरम, दि. 6 - केरळच्या दौ-यावर असलेल्या अरुण जेटलींनी संघाच्या कार्यकर्त्यांची हत्या करणा-या कथित कम्युनिस्टांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशा भ्याड हल्ल्यांमुळे आमचं मनोबल आणखी वाढणार आहे. कोणताही हल्ला हे कोणाची विचाराधारा संपवू शकत नाही, असंही जेटली म्हणाले आहेत. राजेश शरीरावर 70-80 जखमा होत्या, शत्रूसुद्धा एवढा रानटी नसतो, असं म्हणत जेटलींनी हल्लेखोरांवर आगपाखड केली आहे. गेल्या काही काळापासून आरएसएसच्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येच्या मुद्द्यावर भाजपा स्वतःचे राजकीय विरोधक सीपीएमविरोधात आक्रमक होण्याच्या तयारीत आहे. भाजपानं सर्व वरिष्ठ नेत्यांना केरळच्या रणांगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. या रणनीतीअंतर्गतच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली केरळमध्ये दाखल झाले आहेत. जेटलींनी तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा हत्या करण्यात आलेल्या संघाचे कार्यकर्ते राजेश यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी त्यांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. सीपीएम कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या संघाच्या कार्यकर्त्यांच्या घरालाही अरुण जेटलींनी भेट दिली आहे.केरळ राज्यातील परिस्थिती समजून घेण्यासाठी अरुण जेटलींना मोदींनी पाठवल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक काळापासून सत्ताधारी कम्युनिस्ट आणि आरएसएस व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार उफाळून येतोय. केंद्र सरकारचा हा निर्णय संघाच्या कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवणार आहे. संघानं राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा हवाला देताना राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर जेटलींच्या दौ-याला महत्त्व प्राप्त झालं आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीसह अनेक राज्यांत सत्ता मिळवल्यानंतर आता त्यांनी स्वतःचं लक्ष्य केरळवर केंद्रित केलं आहे. देशातील अनेक राज्यांत सत्ता हस्तगत केल्यानंतर भाजपानं आता केरळकडे मोर्चा वळवला आहे. उत्तर भारतात हातपाय पसरलेल्या भाजपानं आता दक्षिणेकडे कूच केली आहे.
त्याच्या शरीरावर 70-80 जखमा, शत्रूसुद्धा एवढा रानटी नसतो- अरुण जेटली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2017 2:53 PM