नवी दिल्ली - नोटाबंदी आणि जीएसटी यांसारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान मोदींच्या पाठिशी कायम ठामपणे उभे असणारे नेते अरुण जेटली होते.
एम्स रुग्णालयामार्फत पत्रक जारी करुन अरुण जेटली यांचे निधन झाल्याचे कळविण्यात आले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात दुपारी 12.07 मिनिटांनी जेटलींनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर देशातील राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त करण्यात येत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार आधीपेक्षा जास्त बहुमताने निवडून आले. तथापि, जेटली यांनी प्रकृतीच्या कारणामुळे या सरकारमध्ये सहभागी होण्याचे नाकारले. 29 मे 2019 रोजी त्यांनी एक पत्रच त्यासाठी मोदी यांना लिहिले. सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले असले तरी समाजमाध्यमांवर ते सक्रिय होते. समाजमाध्यमांतून ते मोदी सरकारच्या निर्णयाचे समर्थन करीतच राहिले. घटनेतील 370 व 35 अ कलम हटविण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारी पोस्ट त्यांनी नुकतीच टाकली होती. जम्मू आणि काश्मीरच्या निर्णयाबाबत सुषमा स्वराज यांच्याप्रमाणेच अरुण जेटलींनीही मोदींचं अभिनंदन केलं होतं.
पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांनी अशक्य ते शक्य करुन दाखवलं, असं ट्विट जेटलींनी केलं होतं. मोदींच्या या निर्णयाचं स्वागत जेटलींनी केलं होतं.