ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेवर असतानाच मला लक्ष्य करण्यासाठी एका खासदाराने काँग्रेसची मदत घेतली होती. या खासदाराने काँग्रेस सरकारला पत्र लिहीले. त्यानंतर त्याने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेतली. या भेटीमध्ये दोघांनी मला अडकवण्याची योजना ठरवली होती असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे.
अरुण जेटली यांनी नाव घेतले नसले तरी, त्यांचा इशारा भाजप खासदार किर्ती आझाद यांच्याकडे आहे. किर्ती आझाद यांनी वेळोवेळी दिल्ली क्रिकेट संघटनेतील कारभारावरुन अरुण जेटली यांना लक्ष्य केले आहे.
डीडीसीएतील भ्रष्टाचारावरुन आम आदमी पक्षाने अरुण जेटली यांना लक्ष्य केलेले असताना आज किर्ती आझादही पत्रकारपरिषद घेऊन डीडीसीएच्या कारभारासंदर्भात मोठा खुलासा करणार आहेत. किर्ती आझाद यांना भाजप नेतृत्वाने मर्यादा न ओलांडण्याचा इशारा दिला आहे मात्र आझाद आपल्या निर्णयावर ठाम आहेत.