ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - दिल्ली क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) गैरव्यवहाराबाबत चुकीचे आरोप केल्याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात दहा कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. केजरीवाल यांच्यासह संजय सिंह, राघव चढ्ढा, आशुतोष व जीपक वाजपेयी यांच्याविरोधातही हा खटला दाखल करण्यात आला आहे.
दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी असताना भ्रष्टाचार केल्याचा निराधार आरोप करून आपली बदनामी करण्यात आली, असे जेटली यांच्यातर्फे न्यायालयात सादर करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे. या खटल्यामुळे नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला. डीडीसीएच्या कारभारातील गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी दिल्ली सरकारने रविवारी गोपाल सुब्रमण्यम यांची एकसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जेटली यांच्याकडून बदनामीचा खटला दाखल करण्यात आला.
भाजपाने या प्रकरणात जेटलींना पाठिंबा दिला असून आम्हाला अरुण जेटली यांच्या प्रामाणिकपणाचा, निष्ठेचा आणि विश्वासहर्तेचा अभिमान असल्याचं मत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं होतं.
दिल्लीमध्ये क्रिकेटचे मैदान तयार करण्यासाठी डीडीसीएने २४ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली होती. पण प्रत्यक्षात ११४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. जेटली हे ‘एलिट क्लब’प्रमाणे डीडीसीएचा कारभार चालवत होते, असे आरोप करण्यात आले होते. तसेच ते मंत्रीमंडलात असेपर्यंत त्यांची सखोल चौकशी होऊ शकत नाही, असे सांगत पंतप्रधान मोदींनी त्यांना मंत्रीमंडळातून काढावे, अशी मागणीही 'आप'तर्फे करण्यात आली.