कायदा, वित्त, संरक्षण अशा विविध विषयांचा प्रगल्भ अभ्यास असणारे अरुण जेटली हे केवळ भाजपचेच नाही, तर या देशाची बौद्धिक संपदा होते. अशी माणसे दुर्मीळ असतात.भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर सुरुवातीला मला दिल्ली नवखी वाटायची. दिल्लीचे राजकारण फार वेगळे आहे. इथे आपण यशस्वी होऊ शकू का, असा प्रश्न सुरुवातीच्या काळात मला नेहमी भेडसवायचा. त्यावेळी केंद्रामध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार होते. भाजपसमोर अनेक आव्हाने होती. माझा मोकळाढाकळा स्वभाव, जे वाटले ते स्पष्ट बोलणे. एखादी गोष्ट खटकली की, तोंडावर बोलून मोकळे होणे. दिल्लीच्या राजकारणात मात्र माझा हा स्वभाव दोष ठरणार की काय, अशी भीती वाटायची. या अशा वातावरणात मला अरुण जेटली नावाचा एक ज्येष्ठ मित्र भेटला.
जेटलीजींशी माझा अनेक वर्षांपासूनचा परिचय होता, पण मी दिल्लीला येण्यापूर्वी महाराष्ट्रातच बरीच वर्षे काम केले असल्याने, त्यांच्याशी माझे खूप घनिष्ठ नाते नव्हते. दिल्लीत आल्यानंतर हे नाते ऋणानुबंधात परिवर्तित झाले. ज्याच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवावा आणि मनातल्या साऱ्या भावना बोलून दाखवाव्यात, असा एक सहकारी मला अरुण जेटली यांच्या रूपाने दिल्लीत गवसला. अध्यक्ष म्हणून काम करताना, पक्षांतर्गत निर्णय घेताना अनेकदा अडचणी यायच्या, संभ्रम व्हायचा. अशा वेळी जेटलीजी मदत करायचे. जेटली यांनी मला वेळोवेळी भावाप्रमाणे मार्गदर्शन केले. कायद्याचे ते गाढे अभ्यासक होते. त्यामुळे त्यांच्या सूचना, सल्ले तार्किकदृष्ट्या योग्य असायचे. एखादा क्लिष्ट विषयदेखील ते व्यवस्थित समजावून सांगायचे. पक्षाच्या बैठकीतही एखाद्या विषयावर ते सखोल विचार व अभ्यास करूनच बोलायचे.राज्यसभेत पक्षाचे नेते असताना त्यांनी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारला आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी अनेकदा अडचणीत आणले. पुढे २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर, एक अनुभवी आणि ज्येष्ठ सहकारी म्हणून मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे अनेक सहकारी जायचे. अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकिर्द देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविली जावी, अशीच होती. आपल्या मूल्यांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यासाठी ते वैयक्तिक हितसंबंधांची पर्वाही केली नाही. त्यांची बुद्धिमत्ता तर तीक्ष्ण होतीच, शिवाय विविध मुद्दे समजून घेऊन, त्याचे योग्य आकलन करण्याची क्षमताही अफाट होती. त्यामुळेच भारतातील आघाडीच्या वकिलांत त्यांचे नाव होते.दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीतून अरुण जेटली यांचे नेतृत्व घडत गेले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला केवळ दिल्लीतच नाही, तर संपूर्ण भारतात पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. तो असा काळ होता की, त्या काळात संघटना बांधणे आणि ती तळागाळात रुजविणे हे अत्यंत कठीण काम होते. जेटली रात्रंदिवस मेहनत घ्यायचे. निष्णात वकील असूनही या सगळ्या व्यापात ते संघटनेला आणि पक्षालाही भरपूर वेळ द्यायचे. देशात आणि जगात नेमके काय सुरू आहे, याची त्यांच्याकडे अचूक माहिती असायची.
कायदा, वित्त, संरक्षण अशा विविध विषयांचा प्रगल्भ अभ्यास असणारे अरुण जेटली हे केवळ भाजपचेच नाही, तर या देशाची बौद्धिक संपदा होते. अशी माणसे दुर्मीळ असतात. त्यांच्या सर्वांगीण जडणघडणीसोबतच समाज आणि देशही घडत असतो. आपल्यातील बुद्धिमत्तेचा फायदा समाजात खोलवर रुजावा आणि त्यातून साऱ्यांचेच भले व्हावे, अशी तळमळ घेऊन ही माणसे जगत असतात आणि समाजातील असंख्य होतकरू आणि धडपडणाºया तरुणांचे भरणपोषण करत असतात. अरुण जेटली यांच्या निधनाने केवळ भाजपचीच नाही तर या देशाची, जगाची अपरिमित हानी झाली आहे. माझ्या या ज्येष्ठ सहकाºयाला व कौटुंबिक मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली.- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री