इलोक्टरल बाँड ही त्यांची योजना टीकेचा विषय बनली असली, तरी सरळमार्गाने पक्षांना पैसा उभा करण्याचा मार्ग त्यातून पुढे आला, हे नाकारता येत नाही. आर्थिक वा सामाजिक सुधारणा समाजाला कितपत रुचतील, हे लक्षात घेऊन तितकीच पावले आधी टाकण्याची दक्षता जेटली घेत. जीएसटी, इलेक्टोरल बाँड, इनसोल्व्हन्सी कोड आदी सुधारणांतून हे लक्षात येते. झेप घेण्यापेक्षा लहानलहान सुधारणा करून अर्थव्यवस्था मार्गी लावण्याकडे जेटली यांचा कल होता. त्यांच्या काळात केंद्र सरकारची तूट मर्यादेत राहिली, हे विसरता येत नाही.अरुण जेटली यांच्या निधनामुळे मोदींच्या सत्ता परिवारातील दरबारी राजकारणी काळाच्या पडद्याआड गेला आहे. जेटली हे जनतेमधील राजकारणी नव्हते. त्यांचा वावर दरबारात असे. त्यांची बुद्धिमत्ता, कायद्याचा अर्थ लावण्यातील निपुणता आणि विरोधकांचे कच्चे दुवे नेमके हेरण्याची क्षमता याचा उपयोग भारतीय जनता पार्टीला नेहमी होत असे. ते दरबारी राजकारणी असले, तरी काँग्रेसमधील दरबारी राजकारण्यांप्रमाणे नव्हते, हेही लक्षात घेतले पाहिजे. जेटलींच्या राजकारणामध्ये स्वार्थापेक्षा पक्षाच्या फायद्याला नेहमी अग्रक्रम होता. दिल्लीतील उच्चभ्रू वर्तुळात ते वावरत आणि खान मार्केट गँग म्हणून मोदी ज्याला हिणवत, त्या गँगमध्येही जेटली यांच्याबद्दल आदर होता. उत्तम वाक्चातुर्य व चलाख युक्तिवाद यांचा वापर करून खान मार्केट गँगचा भाजपविरोधातील प्रचार उधळून लावण्यात जेटली वाकबगार होते. असे करण्यात त्यांना बौद्धिक आनंदही मिळत होता.
संसदपटू म्हणून जेटली अधिक चांगले चमकले. राज्यसभेतील त्यांचे काम उल्लेखनीय होते. विरोधी पक्षनेते म्हणून ते प्रभावी काम करीत. सर्व पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध ठेवीत. त्यांची टीका जहाल असली, तरी विषारी नसे. टीकेपलीकडेही मित्रभावना ठेवण्याची त्यांची वृत्ती होती. मात्र, मैत्र टिकविताना भाजपाच्या राजकीय हेतूंना धक्का पोहोचणार नाही, याची ते काळजी घेत आणि मैत्रीसाठी विचारधारा पातळ होऊ देत नसत. जेटली हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकारणात आले. ते कट्टर संघीय नव्हते. संघाच्या परंपरावादी विचारसरणीपेक्षा आधुनिक विचारसरणीशी त्यांचे नाते होते. मात्र, अन्य पुरोगाम्यांप्रमाणे हिंदू आचारविचारांचा त्यांनी कधीही दु:स्वास केला नाही. त्याचबरोबर, कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे बाष्कळ समर्थनही केले नाही. सहमतीने राजकीय हेतू साध्य करण्याची कला त्यांच्याकडे होती. त्यासाठी लागणारा बौद्धिक युक्तिवाद करण्याची क्षमता होती. असा युक्तिवाद करणारा जवळचा सहकारी आता नाही, हे मोदींचे मोठे नुकसान आहे. मोदी लोकप्रिय आहेत व आपले म्हणणे सामान्य जनतेच्या गळी उतरविण्यात वाकबगार आहेत, परंतु आपल्या दृष्टिकोनाला बौद्धिक पाठबळ देण्याची क्षमता मोदींकडे नाही. ती गरज जेटली पुरी करीत. अडचणीच्या प्रसंगी संघर्ष न करता वाटाघाटीतून मार्ग काढण्याची क्षमता जेटलींजवळ होते. ट्रबलशूटर किंवा आपत्तीनिवारक अशी त्यांची प्रतिमा होती. पक्ष वा सरकार अडचणीत सापडले की त्यांच्याकडे धाव घेतली जात असे. असा नवा आपत्तीनिवारक मोदींना आता शोधावा लागेल, कारण अमित शहा नेहमी संघर्षाच्या पवित्र्यात असतात. भाजपातील अन्य नेते मोदींना मानत असले, तरी जेटलींइतके ते विश्वासाचे नाहीत.
- प्रशांत दीक्षित