नवी दिल्ली - अर्थमंत्री अरुण जेटली मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी असून त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. तथापि, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा पुढील महिन्यातील लंडनचा दौरा रद्द करण्यात आला आहे.एम्सचे डॉक्टर सध्या अरुण जेटली यांच्या निवासस्थानी त्यांची तपासणी करत आहेत. मूूत्रपिंडरोपण करायचे वा नाही? याचा निर्णय व्हायचा असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना एम्समध्ये दाखल केले जाऊ शकते.लंडनमध्ये पुढील आठवड्यात होणाऱ्या ब्रिटन - भारत आर्थिक चर्चेत ते सहभागी होणार नाहीत. भाजपाचे सरकार आल्यानंतर जेटली यांच्यावर पोटाशी संबंधित शस्त्रक्रिया झाली होती. जेटली यांना दीर्घकाळापासून मधुमेह असून, वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही शस्त्रक्रिया झाली होती. ती शस्त्रक्रिया मॅक्स हॉस्पिटलमध्ये झाली. पण काही गुंतागुंत झाल्याने त्यांना नंतर एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यातआले होते. तसेच, काही वर्षांपूर्वी जेटली यांची हृदय शस्त्रक्रिया झाली होती. अरुण जेटली यांच्या तपासण्या सुरू आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले नाही. पण, संसर्गापासून वाचण्यासाठी सार्वजनिक बैठकांपासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.त्यामुळे ते सोमवारपासून कार्यालयातही गेलेले नाहीत. राज्यसभेवर फेरनिवड झाल्यानंतर त्यांनी शपथही घेतली नाही. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी समाप्त झाला आहे. ते उत्तर प्रदेशातून पुन्हा राज्यसभेवर निवडून आले आहेत.
अरुण जेटली सार्वजनिक बैठकांपासून दूर , संसर्ग टाळणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 1:28 AM