नवी दिल्ली : राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी प्रत्येक भाषणात राफेल विमानाची वेगवेगळी किंमत सांगतात, असं जेटली यांनी म्हटलं. शस्त्रक्रियेनंतर राजकारणात सक्रीय झाल्यावर पहिल्यांदाच दिलेल्या मुलाखतीत जेटली यांनी राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले.
काँग्रेसनं राफेल विमान खरेदी संदर्भात केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आणि तथ्यहीन आहेत, असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं. 'राहुल गांधी त्यांच्या प्रत्येक भाषणात राफेल विमानाची वेगवेगळी किंमत सांगतात. आतापर्यंत त्यांनी राफेल विमानाच्या सात वेगवेगळ्या किमती सांगितल्या आहेत', असं जेटली म्हणाले. 'काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून दिले जाणारे तर्क प्राथमिक शाळेतील मुलासारखे आहेत. 2007 मध्ये करण्यात आलेल्या करारापेक्षा 2015 मध्ये करण्यात आलेला करार कित्येक पटींनी चांगला आहे,' असा दावा त्यांनी केला.
'आम्ही एका राफेल विमानासाठी 500 कोटीपेक्षा थोडे जास्त देत होतो आणि मोदी सरकार त्याच विमानासाठी 1600 कोटी रुपयांपेक्षा थोडी जास्त रक्कम मोजत आहेत, अशा शब्दांमध्ये राहुल गांधी बोलतात. यावरुन त्यांची समज लक्षात येते,' अशा शब्दांमध्ये जेटलींनी राहुल यांची खिल्ली उडवली. काँग्रेस सरकारनं हा करार करण्यास इतका उशीर का केला, याचं उत्तर राहुल यांनी देशाला द्यावं, असा पलटवारदेखील त्यांनी केला. काँग्रेस सरकारमध्ये संरक्षण मंत्रीपद भूषवलेल्या ए. के. अँटनी यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणीदेखील त्यांनी केली.
राहुल गांधी प्रत्येक भाषणात राफेल विमानाची किंमत वेगळी सांगतात, असं जेटली यांनी मुलाखतीत सांगितलं. 'जयपूरमध्ये राहुल यांनी राफेल विमानाची किंमत 520 कोटी आणि 540 कोटी सांगितली. विशेष म्हणजे या दोन्ही किमती त्यांनी एकाच भाषणात सांगितल्या. त्यांनी हैदराबादमध्ये राफेलची किंमत 526 कोटी सांगितली होती,' अशी आकडेवारी जेटलींनी दिली. 'राहुल यांच्या विधानांवरुन त्यांच्या बोलण्यात किती खरेपणा आहे, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. सत्य एकच असतं. मात्र खोटेपणा अमर्याद असू शकतो,' असं म्हणत जेटलींनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं.