ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - क्रिकेटनंतर आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हॉकीच्या खेळामुळेही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अरुण जेटली हॉकी इंडिया लीगच्या सल्लागार समितीवर असून, हॉकी इंडिया फेडरेशनचे माजी प्रमुख के.पी.एस गिल यांनी त्यांच्यावर आर्थिक अनियमितता केल्याचे आरोप केले आहेत.
गिल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून अरुण जेटली यांची तक्रार केली आहे तसेच हॉकी इंडियामध्ये मोठया प्रमाणावर अनियमितता असल्याचा आरोप केला आहे. अरुण जेटली यांनी हॉकी इंडिया लीगच्या कायदेशीर समितीवर आपली मुलगी सोनाली जेटलीची नियुक्ती केली आणि तिला मोठया प्रमाणावर रोख रक्कम दिली असा आरोप गिल यांनी केला आहे.
जेटली यांनी एकतर मंत्रिपदावर रहावे किंवा सल्लागार समितीच्या पदाचा राजीनामा द्यावा असे गिल यांनी पत्रात म्हटले आहे. प्रशिक्षण शिबिरात खेळाडूंनी चांगल्या दर्जाच्या अन्नाची मागणी केली म्हणून त्यांना निलंबित केले जाते. निलंबनावर स्थगिती मिळवण्यासाठी खेळाडूला न्यायालयात जावे लागले पण त्याला संघात स्थान मिळाले नाही असे गिल यांनी आपल्या पत्रातून आरोप केले आहेत.