नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोणकोणते बदल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मोदी कोणत्या नेत्याकडे कोणती जबाबदारी देणार, अमित शहांकडे कोणतं खातं सोपवलं जाणार, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात अरुण जेटलींकडे अर्थ मंत्रालयाचा कारभार सोपवला जाणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून जेटली यांच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांना अर्थमंत्री होण्यास फारसा रस नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. अरुण जेटलींची तब्येत फारशी चांगली नाही. त्यामुळेच त्यांच्याकडे अर्थ मंत्रीपदाची जबाबदारी दिली जाणार नाही. त्यांच्याकडे एखादं कमी महत्त्वाचं खातं दिलं जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबद्दल संपर्क साधला असता, जेटलींनी कोणताही प्रतिसाद न दिल्याचं 'नवभारत टाईम्स'नं म्हटलं आहे. जेटलींचे खासगी सचिव एस. डी. राणाकोटी आणि सहाय्यक सचिव पद्म सिंह जामवाल यांनीदेखील याबद्दलच्या ई-मेलला उत्तर दिलं नाही. लोकसभा निवडणुकीतील शानदार विजयानंतर काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपा मुख्यालयात पोहोचले. त्यावेळी पक्षाध्यक्ष अमित शहांसह भाजपाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र मोदींच्या मंत्रिमंडळात अर्थ मंत्रीपद भूषवणारे अरुण जेटली अनुपस्थित होते. गेले दोन आठवडे ते कोणत्याही कार्यक्रमात दिसलेले नाहीत. मात्र ब्लॉग आणि सोशल मीडियाच्या ते सक्रीय आहेत.
मोदी-2 मध्ये जेटली नसणार अर्थ खात्याचे कारभारी?; कोणाला मिळणार जबाबदारी?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 7:00 PM