कोलकाता- माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी पुन्हा एकदा अरुण जेटलींवर निशाणा साधला आहे. जर मी अरुण जेटलींच्या जागी असतो तर केव्हाच राजीनामा दिला असता, असं विधान चिदंबरम यांनी केलं आहे. भारतातल्या चेंबर ऑफ कॉमर्समधल्या आयोजित परिसंवादात ते बोलत होते. 2018-19 या आर्थिक वर्षात सादर करण्यात आलेल्या केंद्रीय बजेट या विषयावर त्यांनी मतं मांडली आहेत.जेटलींना दुस-यानं लिहिलेलं बजेटचं भाषण वाचून दाखवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला असेल. सरकार तिजोरीतला पैसा वाढवण्यास असमर्थ ठरलं आहे. सरकारनं अनेक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी चांगल्या व्यवस्थापकांची नियुक्ती करण्याची गरज आहे. सरकारच्या योजना चांगल्या आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी करणारे व्यवस्थापक अयोग्य आहेत. तसेच स्वच्छ भारत, ग्रामीण विद्युतीकरण आणि एलपीजी वितरण योजनांचा अद्याप त्यांना फायदा पोहोचलेला नाही.स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधण्यात आले आहेत. परंतु त्या शौचालयांत पाण्याचं कनेक्शनच नाही. त्यामुळे सरकारच्या यावर विचार करण्याची गरज आहे. कोणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करत नाही आहे. त्यांचा हेतू चांगलाच आहे. परंतु त्या योजनांची अंमलबजावणी करणारे व्यवस्थापक चांगले नाहीत.
अरुण जेटलींच्या जागी असतो तर केव्हाच राजीनामा दिला असता, चिदंबरम यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 3:41 PM