ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - दिल्ली क्रिकेट संघटनेतील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन विरोधक केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य करत असताना भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने अरुण जेटलींची पाठराखण केली आहे.
मी दिल्लीकडून खेळताना मला एखाद्या खेळाडूची संघातील निवड आश्चर्यकारक वाटली तर मी, ते लगेच जेटलींच्या निदर्शनास आणून देत असे आणि अरुण जेटलीही तात्काळ पावले उचलून योग्य त्या खेळाडूला न्याय मिळवून द्यायचे. डीडीसीएमध्ये इतरांबद्दलचा अनुभव तितका चांगला नाही पण कधी काही अडचण असेल तर, अरुण जेटली खेळाडूंसाठी नेहमी उपलब्ध असायचे असे सेहवागने आपल्या टि्वटसमध्ये म्हटले आहे.
गौतम गंभीरनेही डीडीसीेए अध्यक्ष म्हणून अरुण जेटली यांच्या कार्याची स्तुती केली आहे. अरुण जेटलींनी करदात्याच्या पैशांचा उपयोग न करता दिल्लीला एक सुंदर स्टेडियम दिले असे गंभीरने सांगितले. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मानेही जेटलींचे समर्थन केले आहे. अरुण जेटलींना मी जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा नेहमीच त्यांच्याशी चांगला संवाद झाला. त्यांनी नेहमीच मला मदत केली असे इशांत शर्माने सांगितले.
अरुण जेटली डीडीसीएचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात डीडीसीएमध्ये मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्यआचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.